Friday, April 26, 2024
Homeनगरपालकमंत्र्यांसह अधिकारी अंधारात चाचपडले

पालकमंत्र्यांसह अधिकारी अंधारात चाचपडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वीज गायब झाल्यावर काय हाल होतात, याचा अनुभव खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरमध्ये घेतला. खरीप नियोजनाच्या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील बत्तीगुल झाली. यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आ.लहू कानडे आणि अधिकार्‍यांवर सभागृहातील अंधारात चाचपडण्याची वेळ आली. अखेर तांत्रिक कारणामुळे वीज सुरू होवू शकत नाही, हे लक्षात आल्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर असलेल्या अन्य सभागृहात बैठक झाली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत खरीप नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारसह ही बैठक होणार होती. यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने बैठकीसाठी लगबग सुरू होती. बैठक सुरू होण्यापूर्वी एक-दोन वेळा विजेने झटके दिले होते. त्यावेळी अधिकार्‍यांनी धावधाव करत वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या आगमनापूर्वी पुन्हा अचानक वीज गायब झाली. यावेळी अंधारात चाचपडतच पालकमंत्री, आ. कानडे यांच्यासह अधिकारी सभागृहातील खुर्च्यांवर विराजमान झाले.

त्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी समिती सभागृहात पालकमंत्र्यांना येण्याची विनंती केली. लवकरच वीज येईल, विनाकारण कशाला ये-जा करता, असे म्हणत पालकमंत्री अंधारलेल्या सभागृहात बसून राहिले. दरम्यान, अधिकारी-कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. सभागृहाबाहेर असणार्‍या वीजेच्या पॅनलमधे बिघाड आहे का, हे शोधले जात होते. काहीजण वीज वितरणाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांशी मोबाईल संपर्क करून हा खटका बंद केला. तो चालू करू का? अशी विचारणा करत होते. मात्र, काही केल्याने वीज सुरळीत न झाल्याने अखेर पालकमंत्री आणि अधिकार्‍यांचा लवाजमा पुन्हा जिल्हाधिकारी दालनासमोरील सभागृहात पोहचला आणि त्याठिकाणी खरीप नियोजनाची बैठक घेण्यात आली.

नाव मोठे लक्षण खोटे ?

नगरचे जिल्हाधिकारी कार्यालय नुकतेच नव्या इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. मात्र, त्याठिकाणी दुसर्‍या मजल्याजवळ मोठी काच फोडण्यात आली असून काचेचे तुकडे जीन्याच्या पायर्‍यांवर विखूरले आहेत. इमारतीतील स्वच्छागृहाच्या दरवाज्यांना बाहेरून कडीकोंडे आहेत. मात्र, आतून दरवाजे उघडण्यासाठी हॅन्डल नाहीत. आतून दरवाजा बंद झाल्यास स्वच्छतागृहात अडकून पडण्याची वेळी काहींवर आलेली आहे. सोबतच वीज गुल झाल्यावर साध्या वीजेच्या ‘बॅकअप’ची सोय नसल्याने गाजावाजा झालेली नवी इमारत ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे’ ठरण्याची भिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या