Friday, April 26, 2024
Homeनगरखरिपावर पावसाची मर्जी खप्पा..रब्बीवरही अवकृपा!

खरिपावर पावसाची मर्जी खप्पा..रब्बीवरही अवकृपा!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खरिपाची पिके जळून गेली. त्यानंतर परतीच्या पावसावर सर्व अपेक्षा असताना तोही अपेक्षा भंग झाला. यामुळे रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या भितीने बळीराजाची काळजी आणाखीच वाढली आहे. असे झाले तर ज्वारी, हरभरा, गहू व कांदा पिके शेतात दिसणार नाहीत.

- Advertisement -

चालू वर्षी जुलै महिन्याच्या सुरूवातील फक्त रिमझिम पाऊस झाल्याने अतिशय कमी ओलिवर शेतकर्‍यांनी पेरणी केली. तसा यंदाचा पावसाळा कोरडाच गेला. उत्तर नगर जिल्ह्यात जेमतेम 47 ते 50% टक्के पाऊस झाला. तोही खंडीत राहिला. काही भागात झाला तर काही भाग वंचित राहिला. यामुळे खरीपातील सोयाबीन, तूर, मका, मूग, कपाशी, कांदा आदी पिके करपून मोठा फटका बसला आहे.

रब्बी हंगामाची सर्व आशा परतीच्या पावसावर अवलंबून होती. मात्र यंदा परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. यामुळे जमिनी कोरड्या पडल्या आहेत. भूगर्भातील पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्यांना खिळ बसली आहे. रब्बीच्या पेरण्याच कुठे होताना दिसत नाही. बाजारपेठेत एरवी बियाणे, खते खरेदीसाठी होणारी लगबग दिसत नाही. यामुळे कृषी सेवा केंद्र चालक चिंतेत आहेत. बियाणे, खतांना उठाव नाही. पुढील काळात पाण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी पेरणीस धजावत नाही, असे चित्र आहे. अद्याप पेरणीपूर्व मशागतीही झालेल्या नाहीत. केवळ पाटपाण्यावर पूर्ण हंगाम पार होण्याची शक्यता वाटत नाही.

पाऊस नसल्याने उसाच्या क्षेत्रातही वाढ झालेली नाही. बहुतांश ऊस हा चारा म्हणून जनावरांसाठी चालला आहे. यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. ऊसाचे पिक सांभाळण्यापेक्षा चार्‍यासाठी विकण्याकडे सध्याचा कल आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागणार आहे. एकंदरीतच पाऊस नसल्याने महादुष्काळाचे सावट असून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आदी सगळेच चिंतातूर आहेत. दिवाळीवर या दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसत असून दिवाळी तोंडावर आली असताना दुष्काळ झळा सोसाव्या लागत आहेत. भविष्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याचा तुटवडा जाणवणार आहे. यासाठी शासन पातळीवर आत्ताच नियोजन व्हावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सध्या खरिपातील सोयाबीन सोंगणीच्या कामास वेग आला आहे. मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पन्न खर्चही निघतो की नाही? अशीच स्थिती आहे.

पिकविम्याची अग्रिम रक्कम अद्यापही मिळेना !

चालू वर्षी शासनाने 1 रुपयात पिकविमा योजना राबविली. सलग 21 दिवसांहून अधिक काळ पाऊस पडला नाही त्यामुळे नियमानुसार भरपाई दिली जाईल. असे आश्वासन सरकारने दिले व 25 टक्के अग्रिम विमा जमा करण्याचा कंपनीला आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कुठेच अशी विमा भरपाई रक्कम अद्याप जमा झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या