Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपरवानगी न घेताच खाम नदी स्वच्छता अभियान!

परवानगी न घेताच खाम नदी स्वच्छता अभियान!

औरंगाबाद – Aurangabad

महानगरपालिकेने सुरू केलेल्या खाम नदी स्वच्छता अभियानच बेकायदेशीर असल्याचे समाेर आले आहे. खाम ही अधिसूचीत नदी असून ती जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत येते. यातील स्वच्छतेपासून पाणी वापराची जबाबदारी जलसंपदाकडे आहे. मात्र, मनपाने कोणतीही परवानगी न घेताच नदीच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे. हे काम शास्त्रीय पद्धतीने न झाल्यास उदभवणाऱ्या चूकीची जबाबदारी कोण घेणार, असा जलसंपदाचा सवाल आहे.

- Advertisement -

पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लोकसहभागातून खाम नदीच्या स्वच्छतेसाठी मोहिम राबवली आहे. मध्यंतरी कामाची सुरूवात झाली. या अंतर्गत नदीपात्रातील कचरा साफ करणे, गाळ काढणे, वृक्षारोपन, सौंदर्णीकरण तसेच स्मार्ट सिटीच्या संकल्पनेनुसार ३ किलोमीटरचा परिसर “पीपल फॉर स्ट्रीट’ म्हणून विकसीत केला जाणार आहे. मात्र, या कामावर जलसंपदा विभागाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नदी जलसंपदाच्या अखत्यारीत

पाटबंधारे अधिनियम १९७६ नुसार सर्व नद्या उगमापासून अंतापर्यंत जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत मोडतात. नदीतील पाण्याचा वापर, स्वच्छता, पूर नियंत्रण, व्यवस्थापन, महसूल जमा करणे तसेच पाणी चोरी, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याची जबाबदारी जलसंपदाची असते. नदीशी संबंधीत कोणतेही काम करण्यासाठी जलसंपदाची लिखीत परवानगी आवश्यक आहे. जलसंपदाचे अधिकारी पाहणी करून काम योग्य वाटले तरच परवानगी बहाल करतात. परंतू लिखीत परवानगी तर दूर तोंडी विचारणाही केली नसल्याची खंत जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी व्यक्त केली.

पालिकेची प्रदूषणाची कबूली

खाम ही गोदावरीची उपनदी आहे. जलसंपदाने जायकवाडीतून पालिकेसाठी ११३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण दिले आहे. हे आरक्षण देतांना पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याची हमी पालिकेने पाणी वापर करारनाम्यात दिली आहे. प्रदूषण झाल्यास दंड लावणे किंवा पाणी पुरवठा बंद करण्याची तरतूद आहे. मात्र, पालिकेनेच नदीत २४९ ठिकाण सांडपाणी मिसळत असल्याचे मान्य केले आहे. म्हणजेच पालिका नदीचे प्रदूषण आणि स्वच्छताही करतेय. हे प्रदूषण आधी थांबवण्याची गरज जलसंपदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

जलसंपदाचीही बेफीकरी

गेल्या १० वर्षात मनपाने चौथ्यांदा खाम स्वच्छता अभियान राबवले आहे. मात्र, आपल्या अखत्यारीतील नदी असतांना जलसंपदाने यासाठी एकदाही पुढाकार घेतलेला नाही. जलसंपदा नदीच्या पाणी वापराची पाणीपट्टी वसूल करते. मात्र, याच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष आहे. हिमायत बागेमागील ऐतिहासीक खाम बंधाऱ्याचे गेट नादुरूस्त आहेत. नदीतील प्रदूषण चिंतेचा विषय आहे. मात्र, जलसंपदाने याची एकदाही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केलेली नाही. यावर अनिल निंभोरे यांनी स्टाफ नसल्याचे कारण दिले.

विचारणा करायला हवी होती

खाम नदी जलसंपदाच्या अखत्यारीत असल्याने कोणतेही काम करण्यासाठी आमची परवानगी आवश्यक आहे. नदी पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यासाठी शास्त्रीय निकष आहेत. ते आम्हाला तपासण्याची गरज आहे. मात्र, आम्हाला विचारणा न करता हे काम केले जात आहे.-अनिल निंभोरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या