Thursday, April 25, 2024
Homeनगरपोळ्याच्या दुसर्‍याच दिवशी ‘सर्ज्या-राजा’चा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पोळ्याच्या दुसर्‍याच दिवशी ‘सर्ज्या-राजा’चा विजेच्या धक्क्याने मृत्यू

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील खालालपिंप्री येथे बैलपोळ्याच्या सणाच्या दुसर्‍याच दिवशी रस्त्याच्यामध्ये पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने बैलजोडीचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. सुदैवाने बैलगाडीतील चौघा कुटुंबीयांनी उड्या टाकल्याने ते बचावले. वीज रोहित्राच्या परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या 4 जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, शेतकरी बाबासाहेब जर्‍हाड (वय 38) रा. बकुपिंपळगाव ता. नेवासा हे बैलगाडीतून शेतात जात असताना त्यांच्यासोबत पत्नी अशाबाई जर्‍हाड (वय 32), मुलगा अण्णासाहेब जर्‍हाड (वय 12), मुलगी कविता (वय 14) हे कुटुंब आपल्या शेतात चारा आणण्यासाठी बैलगाडीतून जात असताना शेजारील खलाल पिंप्री गावच्या शिवारातून जात असताना रस्त्यावर विजेच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या.

परंतु गवतामुळे त्या दिसून आल्या नाहीत. कच्चा रस्ता व जमीन ओली असल्याने विजेच्या तारांना स्पर्श होताच सर्जा व राजा नाव असलेल्या बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, लोखंडी बैलगाडीत बसलेल्या 4 जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.

काल पोळ्याचा सण साजरा केला बैलांना अंघोळ घातली, त्यांना रंग लावून सजविले. बैलाच्या अंगावर सर्ज्या-राजा नावे टाकली. बैलांना मारुती मंदिरासमोर नेऊन नारळ फोडून दर्शन घेतले. पोळ्याचा प्रसाद दिला. बैलांना दुसर्‍या दिवशी चारा आणण्यासाठी गेले असता दोन्ही बैलांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर आभाळच कोसळलं. दिवसभर सर्व कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू होते.

महावितरणसह अन्य संबंधितांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामाही केला. जर्‍हाड याची गरिबी आणि दयनीय अवस्था पाहून प्रशासनाने त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

घटनास्थळी नंदू कोरेकर, विजय चापे, महेंद्र बिडगर, अनिल कोरेकर, रवींद्र कुंताल, अमोल थोरात हे तरुण मदतीला धावले व वीज वितरण अधिकार्‍यांना फोन करून वीजपुरवठा खंडित केला. या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

कर्ज काढून घेतली होती बैलजोडी

जर्‍हाड याची अवघी तीन एकर शेती आहे. परंतु एवढ्याशा शेतीवर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होणं अवघड जात होतं. त्यामुळे त्यांनी कर्ज घेऊन खिलारी जातीचे दोन बैल एक लाख दहा हजार रुपयांना विकत घेतले. या बैलांच्या मदतीने ते दररोज कोणत्या ना कोणत्या शेतकर्‍याकडे जाऊन त्यांच्या शेतात पेरणी व सर्व प्रकारच्या मशागतीची कामे मोठ्या कष्टाने करायचे. त्यातून त्यांना दररोज 1000-1500 रुपयांपर्यंतची मजुरी मिळायची. यातून ते कर्जाची नियमितपणे परतफेडही करायचे.

- Advertisment -

ताज्या बातम्या