पाच हजारांची लाच घेताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर|Ahmedagar

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ लाखांचे कर्ज प्रकरण बँकेकडुन‌ लवकर मंजुर करुन घेऊन सबसीडी लवकर मिळवून देणेकरिता तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. रमेश श्रीहरी सुरुंग (वय 45) असे पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील तक्रारदार यांनी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ लाखांचे कर्ज प्रकरण सहा महिन्यापुर्वी महाराष्ट्र बँक (शाखा हंगेवाडी ता. श्रीगोंदा) येथे दाखल केले आहे. सदर प्रकरण अद्याप प्रलंबित असुन, ते संबंधित बँक मॅनेजर कडुन‌ लवकर मंजुर करुन घेऊन सदर प्रकरणाची सबसीडी लवकर मिळवून देणेकरिता जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी सुरुंग याने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने सोमवारी लावलेल्या लाच मागणी पडताळणीत सुरुंग याने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान सुरुंग याने पाच हजारांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक करांडे, पोलीस कर्मचारी विजय गंगूल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *