Friday, April 26, 2024
Homeनगर'त्या' डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आमदार विखे यांच्या सूचना

‘त्या’ डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आमदार विखे यांच्या सूचना

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

केलवड येथे संसर्गजन्य आजाराने दगावलेल्या गायींची घटना ही अतिशय गंभीर घटना आहे. ही घटना केवळ पशुसंवर्धन विभागाच्या हालगर्जीपणामुळे घडली आहे. संबंधीत पशुवैद्यकीय डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याच्या सूचना राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील केलवड येथे लाळ्या खुरकत घटसर्प या आजाराचा प्रादूर्भावाने 14 गायी, 6 कालवडी, व तीन शेळ्या दगावल्या आहेत. पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. अनेक गायी अजूनही बाधित आहेत. या पार्श्वभुमिवर आमदार विखे पाटील यांनी काल सायंकाळी केलवडला भेट दिली. व संबंधित शेतकर्‍यांच्या गोठ्याची पाहणी करून ग्रामस्थ, पशुसंवर्धन अधिकारी व संबंधित पशुपालक यांची भेट घेतली. या दौर्‍यात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनील तुंबारे, सहायक आयुक्त तालुका लघुपशु सर्व चिकीत्सालय डॉ. श्रीमती ओहोळ यांचेसह केलवड येथील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामस्थांनी केलवडचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पवार यांच्या बाबतच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या. गावात अनेक ठिकाणी लसीकरण केले नाही. मात्र कागदोपत्री लसीकरण झाल्याचे दाखविले. यावेळी रजिस्टरमध्ये गायींना लसीकरण केले, असे रजिस्टर मध्ये शेतकर्‍याच्या नावनिशी नोंदले गेले. ते रजिस्टर आमदार विखे पाटील यांनी बोलावून घेतले. सुरुवातीचे काही नावे वाचली तर योगायोगाने ते शेतकरी तेथे उपस्थित होते. त्या शेतकर्‍यांनी आमच्या गायींना लसीकरण केले नसल्याचे सांगितल्याने संबंधित डॉक्टरचे पितळ उघडे पडले.

केलवड पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 च्या अंतर्गत 1600 गायींना लसीकरण केल्याचे पशुसंवर्धन च्या अहवालात होते. आमदार विखे पाटील यांनी या सर्व शेतकर्‍यांची गायींची लसीकरण खरेच झाले का? याबाबतची माहिती मागितली. गेल्या महिन्यापासून या संसर्गजन्य रोगाने काही गायी दगावल्या! हे घडूनही पुढे खबरदारी म्हणून लसीकरण का केले नाही? आता पुन्हा गायी दगावल्या त्यामुळे आमदार विखे पाटील यांनी डॉ. पवार यांना चांगलेच धारेवर धरले. शासकिय पगार घेऊन आपल्या कर्तव्याशी प्रतारणा करतात अशा डॉक्टरवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही व्हायला पाहिजे.

असे झाल्यास सर्व महाराष्ट्रात, जिल्हाभरात पशुवैद्यकिय क्षेत्रातील अशा लोकांना चपराक बसेल, यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी आपली लेखी तक्रार राहाता पोलीस ठाण्यात दिली पाहिजे, अशी सूचनाही आमदार विखे पाटील यांनी केली. कडक धोरण घेतल्याशिवाय या स्वरुपाच्या घटना भविष्यात घडणार नाही.

ज्या शेतकर्‍यांच्या गायी दगावल्या त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी जिल्हा परिषदेकडून मदत मिळेल. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करते. अशा डॉक्टरला वाचविण्यासाठी वरिष्ठ प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, असे मतही आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केले. निष्काळजीपणा, हालगर्जीपणा करून शेतकर्‍यांचे नुकसान करत असाल तर त्यास शासन व्हायलाच हवे. लसीकरणाचे व्हेरीफिकेशन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी गावोगाव असे होत असेल तर त्यांची माहिती जनसेवाला द्या, ही मोठी घटना आहे. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आपल्याला शेतकर्‍यांचे हित जोपासायचे आहे.

बैठक सुरू असताना गाय दगावली !

आमदार विखे पाटील यांची ग्रामस्थांसमवेत आण्णासाहेब घोरपडे यांच्या वस्तीवर कार्यकर्त्यांशी बैठक सुरू असताना शेजारील रमेश जयराम घोरपडे यांची एक गाय दगावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या