Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकसमादेची संंबळ-पावरी राष्ट्रीय पातळीवर

कसमादेची संंबळ-पावरी राष्ट्रीय पातळीवर

सटाणा । प्रतिनिधी Satana

बेंगलोर येथे देशातील आदिवासी विभागातील ( Tribal Area )एकलव्य निवासी शाळेंच्या राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धेत बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka ) अजमेरसौंदाणे येथील एकलव्य निवासी आश्रमशाळेच्या (Eklavya Residential Ashram School) विद्यार्थ्यांनी सांबळ व पावरी वादनात धमाल उडवित प्रथम क्रमांक पटकावत कसमादेची भूषणावसह संगीत कला राष्ट्रीय पातळीवर पोहचवली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या जनजातीय मंत्रालय नवीदिल्ली अंतर्गत असलेल्या नेस्ट सोसायटीतर्फे दरवर्षी राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व ते वृध्दिंगत व्हावे या हेतूने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा बंगलोर येथे देशातील आदिवासी विभागाच्या सर्व एकलव्य निवासी शाळेंच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत देशातील 24 राज्यांतील एकलव्य शाळेतील दोन हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रारंभी या स्पर्धा राज्यात शाळा पातळीवर नंतर विभागीय व नंतर राज्य पातळीवर घेण्यात येवून राज्याचा संघ निवडला गेला. महाराष्ट्रातील सर्व एकलव्य शाळेंच्या स्पर्धा होवून 82 मुलामुलींची बंगलोर येथील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या संघात बागलाण तालुक्यातील अजमेरसौंदाणे एकलव्य शाळेच्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सांबळ व पावरी वादनात एकलव्य अजमीरसौंदाणे शाळेचे अर्जुन महाले, पवन पवार, रोशन चौरे, दिग्विजय देशमुख या विद्यार्थ्यांनी पावरी, सांबळचे वादन करीत स्पर्धेत अक्षरश: धमाल उडवून दिली होती. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक ठरलेले वाद्य व नृत्य कसमादे भागाचे भूषण ठरले आहे. उत्सवांची रंगत पावरी सांबळशिवाय वाढत नाही. या कलेस विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे सादर करत प्रथम क्रमांक पटकावलाच परंतू पावरी, सांबळला राष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याची कामगिरी बजावली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विविध क्रीडा प्रकारात सात पारितोषिके पटकावित यश संपादन केले.

महाराष्ट्र संघाने सात पारितोषिके पटकावल्याबद्दल विशेषत: अजमीरसौंदाणेच्या विद्यार्थ्यांनी पावरी, सांबळ वादनात प्रथम क्रमांक पटकावत संपादन केलेल्या यशाबद्दल आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, मुख्य अप्पर सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेतील यशाबद्दल महाराष्ट्राच्या संघाचे सर्वथरातून कौतुक केले जात आहे.

पावरी-सांबळ ढाक व डफली शिकण्यासाठी बागलाण तालुक्यातील वादकांना या वाद्यांसह बोलविण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास चौरे यांनी वाद्ये शाळेत उपलब्ध करून दिली होती. पावरी, सांबळ वादकांनी विद्यार्थ्यांकडून अथक परिश्रम करून घेत वादनाची तयारी करून घेतली होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळेच पावरी, सांबळ राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकले आहे.

डॉ. अशोक बच्छाव, प्राचार्य, एकलव्य शाळा

- Advertisment -

ताज्या बातम्या