Saturday, April 27, 2024
Homeनगरकाष्टी ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू

काष्टी ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठी तसेच महत्त्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणार्‍या काष्टी तसेच बेलवंडी गावच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत तालुक्यातील नेते मंडळींचा कस लागणार आहे. माजी मंत्री विद्यमान आ. बबनराव पाचपुते यांची दोन्ही गावांत सध्या सत्ता असली तरी आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

दोन्ही गावांत निवडणूक तयारी म्हणून मेळावे सुरू झाले असून सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार असल्याने जनसंपर्क असणार्‍या उमेदवारांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. काष्टीमध्ये सरपंच पद ओबीसी प्रवर्गाला राखीव आहे. काष्टीमध्ये दोन दिवसांपूर्वी आ.पाचपुते गटाचा मेळावा झाला. यात पाचपुते म्हणाले होते, तालुक्यात सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव असून तालुक्याची राजधानी आहे. मी गावचा सुपुत्र असून माझ्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाहेरील व्यक्तींनी जास्त लक्ष देऊ नये.

आपण ही निवडणूक विकास कामाच्या मुद्यावर जिंकणार आहोत, असे आ. पाचपुते यांनी विरोधकांना सुनावले आहे. परंतु याच मेळाव्यात जुन्या सदस्यांना उमेदवारी देऊ नये. ग्रामपंचायतीमध्ये अनेक महिला सदस्यांना काही पुरुष सदस्यांनी काम करु दिले नाही. म्हणून गावच्या विकासासाठी सुशिक्षित निर्व्यसनी व होतकरू नवीन तरुणांना संधी द्यावी, असा सर्वांचा सूर होता. यासाठी नेतेमंडळींनी जनमताचा कौल पाहून उमेदवारी द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. मात्र, या सुचनांचे किती पालन होते यावर बरेच काही अवलंबून आहे.

पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला विरोधात असलेले नेते भगवानराव पाचपुते व माजी सभापती अरुणराव पाचपुते हे आ. पाचपुते यांच्यासोबत आहेत. यामुळे आ. पाचपुते थेट विजयाचा दावा करत आहेत. मात्र, काष्टी गावात मागील पंचवार्षिकमध्ये 13 सदस्य आ. पाचपुते गटाचे तर चार सदस्य विरोधी गटाचे होते. यावेळी आ. पाचपुते विरोधात कैलास पाचपुते आणि समर्थक पॅनलची तयारी करत असून माजी आ. राहुल जगताप, नागवडे हे मागील प्रमाणे विरोधकांना रसद पुरवणार हे निश्चित मानले जात आहे. यामुळे आ. पाचपुते यांना त्यांच्याच गावात मोठ्या विरोधालाही सामोरे जावे लागणार आहे.

साजन पाचपुते यांची भूमिका महत्त्वाची

जिल्हा परिषद सदस्य स्व. सदाशिव पाचपुते यांचा धाकटा मुलगा आ. पाचपुते यांचा पुतण्या, साईकृपा कारखान्यांचे अध्यक्ष साजन पाचपुते बैठकीला गैरहजर होते. आ. पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे स्व.सदाशिव पाचपुते यांच्या मागे गावच्या राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. आता साजन पाचपुते यांची भूमिका काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या