Wednesday, April 24, 2024
Homeनगरकाष्टीच्या बैलबाजारात शेतकर्‍यांची लूट

काष्टीच्या बैलबाजारात शेतकर्‍यांची लूट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील काष्टी येथील उपबाजार समितीमध्ये नगरसह राज्यभरातून शेतकर्‍यांचे पशुधन विक्रीस येत असते. मात्र या बाजारात पुरेश्या सुविधा मिळत नाहीत तसेच बाजार समिती व दलाल शेतकर्‍यांची अडवणुक तसेच लुट करत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

पशुधन विक्रीस येत असताना उपबाजार समितीच्या दारामध्येच 200 ते 300 रुपयांची पावती फाडली जाते. ही पावती नेमकी कशाबद्दल घेतली जाते? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. या बाजारातुन लाखो रुपये जमा होत असताना उपबाजार समितीकडुन कोणत्याही स्वरुपाची सेवा दिली जात नाही. शेतकर्‍यांना जनावरे बांधावयास जागा मिळत नाही. बाजार समिती कर्मचार्‍याला याबाबत विचारले असता, आमचे काम फक्त पावती फाडणे असुन तुम्ही जनावरे हातात धरुन उभे रहा किंवा बांधा, त्याच्याशी आमचा सबंध नाही अशी उत्तरे मिळत आहेत. यामुळे उपबाजार समितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित रहात आहेत.

दर शनिवारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी उपबाजारात महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील पशुधन विक्रीस व खरेदीस शेतकरी येत असतात. बाजारात पावती फाडुन आत गेल्यानंतर जवळपास 200 पेक्षा जास्त शेतकरी पशुधन हातात धरुन उभे राहतात. दलाल व व्यापारी शेतकर्‍यांना उभे राहु देत नाहीत की खुंटी ठोकु देत नाही. यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. नेमकी उपबाजार समिती व्यापार्‍यांची वा दलालाची की शेतकर्‍यांची असा सवाल शेतकर्‍यांना पडत आहेत. शेतकरी नेहमीच बाजारात जात नाही. तो कधी तरी बाजारात पशुधन घेऊन जात असल्याने नवखा असतो. त्याचमुळे शेतकर्‍यास कोणतेही सहकार्य मिळत नाही. या बाजारात फक्त दलाल व कमिटीची चलती असुन हे दोघे मिळुन शेतकर्‍यांची लुट करत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते कमलेश गुंजाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

लेखी तक्रार नाही

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यांशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, याबाबत कोणाचीही लेखी तक्रार नाही. कोणासही काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा. तसेच याबद्दलचे आदेश कर्मचार्‍यांना देण्यात येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या