Friday, April 26, 2024
Homeनगरकासारा दुमाला येथील देशी दारुच्या दुकानाला अखेर ग्रामपंचायतीची नोटीस

कासारा दुमाला येथील देशी दारुच्या दुकानाला अखेर ग्रामपंचायतीची नोटीस

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील कासारा दुमाला येथील बेकायदेशीररित्या सुरू केलेल्या देशी दारूचे दुकानाला अखेर काल सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. हे दुकान बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आल्याने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या दुकानाबाबत दुर्लक्ष करणार्‍या दारू उत्पादन शुल्क खात्याच्या संगमनेर येथील अधिकार्‍यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीर देशी दारू दुकान सुरू आहे. हे देशी दारू दुकानच बेकायदेशीर असल्याने दुकान चालक या नोटिशीला कसे उत्तर देणार व ग्रामपंचायत दुकानावर केव्हा कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे याबाबत वारंवार तक्रारीही झाल्या होत्या. मात्र उत्पादन शुल्कच्या स्थानिक अधिकार्‍यांनी या दुकानाकडे दुर्लक्ष केले आहे. दारू उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दुकानाचे चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र याबाबत अद्याप त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झाली नाही.

या दुकानाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही दुकान बंद न झाल्याने संबंधित अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान अतिक्रमण जागेवर देशी दारूचे दुकान सुरू असतानाही यापूर्वीच्या ग्रामसेवकांनी या दुकानावर कारवाई का केली नाही ? असा सवाल आता विचारला जात आहे.

उत्पादन शुल्क अधिकार्‍यांची मुजोरी

कासारा दुमाला येथील देशी दारू दुकान संदर्भात स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी असतानाही उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी या दुकानाबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. हे दुकान बेकायदेशीर असल्याचे माहिती असतानाही या दुकानाकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झालेले आहे. यासंदर्भात अनेक नागरिकांनी अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या मात्र या अधिकार्‍यांनी या तक्रारींकडे ही दुर्लक्ष केले. वृत्तपत्रात या दुकानाची पोलखोल होऊनही अधिकार्‍यांनी दुकानाकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली नंतर फोन उचलनेही बंद केल्याने या अधिकार्‍यांची मुजोरी समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या