Wednesday, May 8, 2024
Homeनगरडोंगरातला रानमेवा आता आपल्या दारात !

डोंगरातला रानमेवा आता आपल्या दारात !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आता तालुक्यात दाखल झाली आहेत. डोंगरभागातून हा रानमेवा आता गावोगावी आता विक्रेत्यांमार्फत उपलब्ध झाला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून तसेच अन्य पठारी भागातून हा रानमेवा उपलब्ध होत असतो. यंदा आनेमाळशेज घाटातूनही एक विसीतील तरुण हा रानमेवा राहाता शहर तसेच राहाता तालुक्यातील गावांमध्ये विक्री करत आहे. शेंडे असे या तरुणाचे नाव आहे.

पश्चिम पट्ट्यातील डोंगरदर्‍यात ही करवंदे बहरली आहेत. पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट, गोड, रसाळ, रानमेवा जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच, आवळा, बोरे, कैरी आदिंची चवही काही न्यारीच. उन्हाळा सुरू झाला की, जिभेचे चोचले पुरविणारा काही ठिकाणचा रानमेवा दुर्मिळ होत चालेला असतांना देखील पश्चिम पट्ट्यात सध्या या करवंद रूपी रानमेवेला चांगला बहर आलेला आहे.

आंबट गोड चवीच्या करवंदाचे डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. या झाडांला पांढर्‍या रंगाची फुले येतात. फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंद बहरतात. पिकल्यावर या फळांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपिट करतात.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात करवंदाचे उत्पादन होत नसले तरी ज्या भागात ही करवंदे तयार होतात त्या भागातील आदिवासी बांधव ते विक्रीच्या रुपाने इतर तालुक्यात उपलब्ध करुन देतात. अदिवासी, डोंगरभागात मुख्य रस्त्याच्या कडेला शाळकरी मुले, वयस्क व्यक्ती ही डोंगरची काळी मैना वाटे अथवा टोपलीमध्ये विक्रीसाठी घेवून बसतात. त्या रस्त्याने जाणारी वाहने अथवा वाटसरु ती खरेदी करतात.

आनेमाळशेज घाटातून करवंद विक्रीसाठी आलेला तरुण राहाता शहरात येवून हातात टोपली घेवून करवंदाची चव खवय्यांना देत आहे. वनस्पतीच्या एका पानात त्रिकोणी कोन करुन त्यात ही चविष्ट डोंगरची काळी मैना विक्री करतांना गल्लोगल्लीत दिसून येत आहे. तयार केलेल्या या पानाच्या परडीतुन तो दहा ते पंधरा रुपयांना विक्री करत आहे. ज्या त्या हंगामातील फळे ज्या त्या हंगामात खाल्ली तर ते आरोग्याला चांगले असते. असे विज्ञान सांगते. कॅरिसा कॅरंडास असे शास्त्रीय नाव असलेल्या या करवंदाचे औषधी गुणही असल्याने व चवदार असल्याने लोक आवडीने खातात!

- Advertisment -

ताज्या बातम्या