Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकर्जत नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी-भाजपची व्यूहरचना

कर्जत नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी-भाजपची व्यूहरचना

किरण जगताप | कर्जत तालुका वार्तापत्र

करोनाची परिस्थिती नियंत्रणात येवू लागल्याने रखडलेल्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. 26 नोव्हेंबरला कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे. तेव्हापासून येथे प्रशासकराज आहे. इच्छुकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. आ. रोहित पवार यांच्यासह खा. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून तशी व्यूहरचना आखल्याचे दिसत आहे. भाजपा आपली सत्ता टिकवून ठेवणार की खितपत पडलेल्या शुन्यातील राष्ट्रवादीला आ. रोहित पवार हे सत्तेपर्यंत घेऊन जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

अनेक दशके भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघातील कर्जत नगरपंचायतीतही भाजपची सत्ता होती. आता भाजपाचा बालेकिल्ला ढासाळून आ. रोहित पवारांनी एन्ट्री केल्याने मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तरीही नगरपंचायतीत पवारांना शुन्यातून पुढे जायचे असल्याने त्यांनी तशा हालचाली सुरू केलेल्या आहेत. भाजपाच्या सत्तेच्या काळात नगराध्यक्ष राहिलेले आणि कर्जत शहरातील राजकारणावर घट्ट पकड असलेले नामदेव राऊत व त्यांचे काही सहकारी हे आ. पवारांसोबत आले आहेत. ही जमेची बाजू आहे. त्याचा राष्ट्रवादीला किती फायदा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. पवार यांची स्वतंत्र यंत्रणा शहरात कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेपेक्षा जनतेतील सर्वेक्षणाचा कौल लक्षात घेऊनच पवार हे उमेदवार निश्चित करतील असे दिसते.

तालुक्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद असताना कर्जत नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत पक्षाला आपले खातेही खोलता आले नाही. राष्ट्रवादीच्या 14 उमेदवारांना मिळून मतांचा चार अंकी आकडा गाठता आला नाही. येथे नेतृत्व करणारे नेते हे त्यांच्या वैयक्तिक सोयीनुसार पक्षाच्या चिन्हाचा वापर करत असल्याची चर्चा त्यावेळी झाली. ही चिंतेची बाब असताना याकडे पक्षाने कधी गांभीर्याने पाहिले नाही. मात्र पक्षाच्या अध्यक्षांचे नातू आ. रोहित पवार हेच आता येथे सर्वेसर्वा झाल्याने हा प्रश्न मिटला आहे. निवडणुकीच्या काळात पडद्याआड कोण काय करते? यावर त्यांचा विशेष वॉच असणार आहे. त्यामुळे पक्षातील फितूर हिट लिस्टवर आहेत.

आउटगोइंगमुळे झालेले डॅमेज रोखण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे त्यांच्या पराभवानंतर कधी नव्हे एवढे सक्रिय झाले आहेत. विधानसभेतील अनेकांच्या पराभवाचा ठपका त्यांनी विखे यांच्यावर ठेवला होता. तसा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे विखे आणि शिंदे यांच्यात काही काळ कटुता आली होती. मात्र आ. रोहित पवारांचे संकट पेलण्यासाठी विखे आणि शिंदे यांनी आता चांगलेच जुळवून घेतले आहे. खा. सुजय विखे आणि प्रा. राम शिंदे यांनी कर्जत शहरात लक्ष केंद्रित करून नगरपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपातील कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या राजकीय घडामोडी कर्जतमध्ये दिसणार आहेत हे मात्र नक्की !

असे आहे सध्याचे पक्षीय बलाबल

कर्जत नगर पंचायतीत 17 पैकी 12 नगरसेवक हे भाजपाचे होते. काँग्रेस – 4, अपक्ष – 1, राष्ट्रवादी – 0, शिवसेना – 0 अशी स्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या