Friday, April 26, 2024
Homeनगरकर्जत -जामखेड तालुक्यातील पाणी योजनांना 225 कोटींचा निधी

कर्जत -जामखेड तालुक्यातील पाणी योजनांना 225 कोटींचा निधी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राज्य सरकारच्या महत्त्वाकांंक्षी जलजीवन मिशन या योजनेमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील 177 गावांसाठी तब्बल 225 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून 55 गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कर्जत व जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती अवगत करून दिली. त्यांचा याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पाणी योजनांसाठी राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघातील सर्व गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करून घेतला होता.

अधिकारी, सर्व्हेअर आणि संबंधित गावाचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात संवाद घडवून आणला आणि त्यांनाही या सर्वेक्षणात सहभागी करुन घेतले.तांत्रिक, प्रशासकीय व अंतिम मान्यता मिळवली आहे. टप्प्याटप्प्याने टेंडर निघत असून 55 गावांमध्ये प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. जलजीवन योजनेत समावेश झालेल्या गावांमध्ये कर्जत तालुक्यातील 101 तर जामखेड तालुक्यातील 76 गावांचा समावेश आहे.

यापैकी कर्जत तालुक्यातील 33 आणि जामखेड तालुक्यातील 22 अशा एकूण 55 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली आहेत आणि निविदा स्तरावर असलेल्या योजनांना गती देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे या सर्वच गावातील नळ पाणीपुरवठा योजना लवकर सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

पाण्याअभावी होणारा त्रास महिला भगिनींनाच सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गावातील महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडी सरकारने सर्व गावांच्या योजना मंजूर केल्या. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब हेच होते. त्यामुळे आताही ते या कामाला गती देतील, असा विश्वास आहे.

– आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड

- Advertisment -

ताज्या बातम्या