Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशKargil Vijay Diwas 2022 : कारगिल लढाईत पराक्रम गाजवणारे भारतीय शूर सैनिक!

Kargil Vijay Diwas 2022 : कारगिल लढाईत पराक्रम गाजवणारे भारतीय शूर सैनिक!

आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण केले जात आहे. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि युद्धातील विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ‘ऑपरेशन विजय’च्या यशाचे प्रतीक मानला जातो.

‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून भारताच्या शूर सैनिकांनी कारगिल द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. मातृभूमीचे रक्षण करताना ५०० हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. त्याच वेळी, युद्धादरम्यान ३००० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले. जाणून घेऊयात भारतीय शूरवीरांबद्दल ज्यांनी कारगिल युद्धात आपला जीव धोक्यात घालून विजय मिळवला.

- Advertisement -

कॅप्टन मनोजकुमार पांडे

कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचा जन्म २५ जून १९७५ रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील रुधा गावात झाला. लहानपणापासूनच पांडे यांना देशसेवेची आवड होती. यामुळेच त्यांनी भारतीय लष्कराची निवड केली. मनोज कुमार पांडे १९९७ मध्ये गोरखा रायफल्सचा भाग बनले. डोंगरावर चढून शत्रूंवर हल्ला करण्यात ते पटाईत होते. यामुळेच सियाचीनमध्ये पोस्टिंग असूनही त्यांना कारगिल युद्धाच्या वेळी बोलावण्यात आले होते. मनोज कुमार यांनी आपल्या बटालियनचे नेतृत्व करत कुकरथांग आणि जबुरटॉप ही शिखरे दोन महिन्यांत पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केली. ३ जुलै १९९९ रोजी ते शहीद झाले. त्यांच्या शौर्याला सलाम करून, त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक प्रदान करण्यात आले.

योगेंद्र सिंह यादव

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना कारगिल युद्धादरम्यान दाखविलेल्या अदम्य धैर्याबद्दल परमवीर चक्र हा सर्वोच्च भारतीय लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे कारगिल युद्धादरम्यान कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) होते. सध्या ते सुभेदार मेजर आहेत. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना वयाच्या १९ व्या वर्षी परमवीर चक्र मिळाले. योगेंद्र सिंह यादव हे हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण सैनिक आहेत. योगेंद्र सिंह यादव यांचा जन्म १० मे १९८० रोजी सिकंदराबाद, बुलंदशहर, उत्तर प्रदेशातील औरंगाबाद अहिर गावात झाला. त्यांचे वडील करण सिंग यादव यांनी कुमाऊँ रेजिमेंटमध्ये १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. यादव वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले.

लेफ्टनंट विजयंत थापर

‘राजपूताना रायफल्स’मध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात ‘डर्टी डजन’ या १२ सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला ‘लीड’ केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खात्मा केला. यात त्यांना वीरमरण आले. ‘बॅटल ऑफ थ्री पिंपल्स’मध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य हुतात्मा झाले, तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत ‘वीरचक्र’ बहाल करण्यात आले.

सुभेदार संजय कुमार

कारगिल युद्धातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित झालेले सुभेदार संजय कुमार आजही ते दृश्य आठवले की रक्ताच्या उकळ्या फुटतात. सध्या डेहराडून अकादमीमध्ये तैनात असलेले सुभेदार संजय कुमार कारगिल युद्धाच्या वेळी रायफलमॅन होते. ४ आणि ५ जुलै १९९९ दरम्यान त्यांनी अदम्य धैर्य दाखवले. कारगिल युद्धादरम्यान फ्लॅट टॉप एरिया काबीज करण्यात संजय कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बात्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर जिल्ह्यातील घुग्गर येथे झाला. ६ डिसेंबर १९९७ रोजी कॅप्टन बत्रा जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या १३ व्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून सामील झाले. दोन वर्षांनंतर त्यांना पदोन्नती देऊन कॅप्टन पद देण्यात आले. कॅप्टन विक्रम बत्रा हे कारगिलचे नायक मानले जातात. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी कारगिल युद्धातील पाच महत्त्वाचे मुद्दे जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारतातील सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या