Thursday, April 25, 2024
Homeनगरकारेगावात गाव बंदचा चोरट्यांनी उठविला फायदा

कारेगावात गाव बंदचा चोरट्यांनी उठविला फायदा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यातील कारेगाव येथे 12 ते 18 मे कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय ग्रामस्थांनी घेत अंमलबजावणीही केली. मात्र याचा फायदा चोरट्यांनी घेतला. शुक्रवारी रात्री एक किराणा दुकान व एक घरफोडी करून ऐवज व रोख रक्कम लंपास केली. गावातील अनेक सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून लवकरातलवकर चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी कारेगावकरांनी लॉकडाऊन सुरू केले. गावात त्यामुळे शुकशुकाट होता. याचाच फायदा चोरट्यांनी उचचला. योगेश मोरगे यांचे संचित किराणा दुकान फोडून 25 हजार रुपये किंमतीचा किराणा माल चोरून नेला. याशिवाय शेजारीच कडूबाई गंगाधर नागुडे यांचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून कपाटातील 5000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच इतर साहित्याची उचकापाचक केली.

गावातील अनेक दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी अनेक दुकानांचे बाहेरील विजेचे दिवे फोडले, सीसी टीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरवले. आयडीबीआय बँकेचा कॅमेरादेखील फिरवला.

तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे माहिती मिळताच घटनास्थळी येऊन सर्व पाहणी केली. पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तात्काळ हस्तरेषा तज्ज्ञांद्वारे तपास सुरू करण्यात आला. निरीक्षक साळवे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून चोरटे लवकरच जेरबंद होतील, असे आश्वासन दिले.

गावात रात्रीची पोलीस गस्त पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उंडे, उपाध्यक्ष नितीन पटारे, सचिव बाळासाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे, प्रणव भारत, निखिल पटारे, गणेश शिंदे आदींनी केली. दरम्यान अण्णासाहेब मोरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या