करंजवण पाणीपुरवठा योजनेचे ‘इतके’ काम पूर्ण

jalgaon-digital
5 Min Read

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

काही ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी आणलेली आडकाठी, मार्गात आलेले मोठ मोठे टेकाड आणि कडक खडक, झाडे अशा एक ना अनेक अडथळ्यांवर मात करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे 79 कि.मी. पैकी सुमारे 30 कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने सुरू असल्याने योजना वेळेत पूर्ण होऊन पुढील वर्षी शहरातील नागरिकांच्या घरात नळाद्वारे रोज पाणीपुरवठा होणार असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

शहराचा सर्वांगीण विकास होण्याकरता पाणी, वीज, चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, जमीन आणि राजकीय इच्छाशक्ती ही सप्तसूत्रे महत्त्वाची मानली जातात. विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या सूत्राच्या बळावर अनेक शहरांनी प्रगती केली असली तरी मालेगावनंतर एकमेव मोठे असलेल्या मनमाड शहरात सर्वात जास्त दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, मुबलक जमीन, वीज आदी गोष्टी असताना केवळ भीषण पाणीटंचाईमुळे शहर विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसून येत होते.

पावसाळा, हिवाळा असो अथवा उन्हाळा वर्षाचे बारा महिने नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र गेल्या 35 ते 40 वर्षांपासून शहरात आहे. जोपर्यंत पाणी समस्या सुटत नाही तोपर्यंत केवळ मनमाडच नव्हे तर नांदगाव तालुक्याचा विकास होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आ. सुहास कांदे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करंजवण योजनेचा पर्याय लक्षात घेतला होता.

या योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरवा सुरू केला. काही अडथळे आले मात्र त्याच्यावर मात केली. पाणीपुरवठा योजनेसाठी ते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात सहभागी झाले आणि योजना केवळ मंजूरच करून आणली नाही तर त्यासाठी तब्बल 325 कोटी रुपयांची तरतूददेखील करून घेतली.

निधी मंजूर झाला असला तरी अडचण होती ती लोकवर्गणीपोटी भरावी लागणारी 15 टक्के रक्कम. 325 कोटीची 15 टक्के रक्कम सुमारे 50 कोटींपेक्षा जास्त होती. इतकी मोठी रक्कम भरण्यास नगरपालिका असमर्थ होती. लोकवर्गणी भरली नाही म्हणून अनेक योजन मंजूर होऊन रखडल्या आहेत. आपल्या योजनेचेदेखील तसे होऊ नये म्हणून आ. सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत लोकवर्गणीची रक्कम विशेष बाब म्हणून माफ करून घेतली आहे. खर्‍या अर्थाने योजना निर्मितीचा मार्ग मोकळा झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कामाला सुरुवात झाली असून करंजवण धरण ते मनमाडपासून जवळ असलेल्या लासलगाव रोडवरील भारतनगरपर्यंत 79 कि.मी. असलेल्या या योजनेचे आतापर्यंत सुमारे 30 कि.मी.ची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

करंजवण धरण ते ओव्हरहेड टाकीपर्यंत 700 एम.एम. व्यास, या टाकीपासून दिंडोरी तालुक्यातील रतनगडपर्यंत 900 एम.एम., रतनगड भारतनगरमधील मोठी टाकी आणि फिल्टर प्लांटपर्यंत 800 एम.एम., भारतनगर ते मनमाडपर्यंत 600 एम.एम. आणि त्यानंतर गावात वेगवेगळ्या भागात 450 एम.एम., 200 एम.एम. आणि 150 एम.एम. साईजची पाईपलाईन टाकली जाणार आहे. करंजवण ते मनमाडपर्यंत टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनवर सुमारे 110 पर्यंत व्हॉल्व्ह बसवण्यात येणार असून त्यात टेम्पर व्हॉल, स्कोर व्हॉल, स्लूस व्हॉल, जनरल व्हॉल यांचा समावेश आहे.

प्रत्येक नागरिकाला रोज 135 लिटर पाणी मिळावे यासाठी एकूण 15 लहान-मोठे जलकुंभ बनवण्यात येणार आहेत. 12 जलकुंभ तयार झाले असून आणखी तीन जलकुंभ बनवले जाणार आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण पाईपलाईन आणि योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे कॉम्प्युटराईज्ड फायबर ऑप्टिकल राहणार आहे.

त्यामुळे कुठेही एक थेंब पाणी लिक झाले तर लगेच त्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणी चोरणे अशक्य होणार आहे. करंजवण धरणावरील आणि डब्ल्यूपीटी फिल्टर प्लांट पूर्णत: सोलर एनर्जीवर चालणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा बोजा पालिकेवर पडणार नसून वीजबिलापासून मुक्ती तर मिळणार आहेच शिवाय वादळी वार्‍यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आता होणार नाही.

पाईपलाईनचे काम सुरू करताना काही ग्रामपंचायती, ग्रामस्थांनी आडकाठी आणली होती. आ. सुहास कांदे यांनी त्यांची भेट आणि बैठका घेऊन त्यांच्या समस्यांचे केवळ निराकरणच केले नाही तर त्यांच्या समस्या सोडवल्या. शिवाय पाईपलाईन टाकताना काही ठिकाणी मार्गात रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे आली, मात्र ती न तोडता बाजूने पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

योजना ठरलेल्या वेळेवर पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस युद्धपातळीवर काम केले जात असून कामावर देखरेख करण्यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यात शिवसेनेच्या इतर पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. प्रत्येकाला त्याची जबाबदारी वाटून देण्यात आल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *