कपालेश्वर मंदिर श्रावणातही बंद; पालखी सोहळा देखील रद्द

पंचवटी । वार्ताहर Panchavati

करोनाचे ( Corona ) महासंकट अजूनही टळले नसल्याने सलग दुसर्‍या वर्षी पवित्र श्रावण महिन्यात शिवालये बंद करण्यात आले आहेत. गोदाकाठी रामकुंडावर असलेल्या प्रसिध्द कपालेश्वर मंदिरात ( Kapaleshwar Temple ) पहिल्या श्रावणी सोमवार (दि.9) निमित्ताने शासनाच्या नियमानुसार पाच ब्रह्मावृंदांच्या उपस्थितीत पूजाविधी केले जाणार आहेत. यासह पालखी सोहळा देखील रद्द करण्यात आला असून, संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी पंचवटी पोलिसांनी मंदिराभोवती बॅरिकेडिंग करून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पवित्र श्रावण महिन्यात विविध प्रकारचे व्रत वैकल्ये, पूजा, पाठ आदी केले जातात. यातही भगवान शंकराची पूजा विशेषकरून केली जाते. म्हणूनच श्रावणी सोमवार आणि शनिवार या दोन दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी (दि.9) श्रावण महिना प्रारंभ होत असून, पहिलाच दिवस श्रावणी सोमवार येत आहे. करोनामुळे संपूर्ण जगभरात हाह:कार माजला असून, लाखो लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

सद्यस्थितीत भारतात तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रावण महिन्यात शिवालये बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने काढले आहेत. तशा प्रकारच्या नोटिसा मंदिर विश्वस्तांना बजावण्यात आलेल्या आहेत. रामकुंडावरील प्रसिध्द कपालेश्वर मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कपालेश्वर मंदिराभोवती बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. श्रावणी सोमवारी याठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन पंचवटी पोलिसांनी केले आहे.

श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद असले तरीही मंदिरात पाच पुजार्‍यांच्या उपस्थितीत नित्य पूजा अर्चा केली जाणार आहे. सोमवारी पहाटे 5 वाजता शिवपिंडीस अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मंदिर प्रांगणात पंचमुखी मुखवट्याची पालखी काढण्यात येणार असून, तीन प्रदक्षिणा घालून मुखवट्यास अभिषेक करण्यात येणार आहे. तर रात्री साडेआठ वाजता कपालेश्वर शिवपिंडीस शृंगार, सजावट केल्यानंतर महाआरती केली जाणार असल्याची माहिती गुरव पुजारी चिन्मय गाढे यांनी दिली


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *