Sunday, May 5, 2024
Homeनगरकानिफनाथ देवस्थानच्या मिळकतीवर अन्य नोंद लावू नये

कानिफनाथ देवस्थानच्या मिळकतीवर अन्य नोंद लावू नये

गुहा |वार्ताहर| Guha

राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या इनामी शेतजमीन मिळकतीवरील 7/12 उतार्‍यावर अन्य नोंद न लावण्याचा ठराव गुहा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

गुहा येथे श्री. कानिफनाथ देवस्थान मंदिर असून सदरचे मंदिर ग्रामदैवत आहे. या मंदिरास मौजे गुहा येथे गट नं. 20 ते 21 व 623 ते 639 हे गट इनामी मिळालेले आहेत. तशी 7/12 सदरी श्री कनिफनाथ देवस्थान गुहा प्रतिबंधक सत्ता प्रकार महाराष्ट्र राज्य, असा उल्लेख आहे. असे असताना अध्यक्ष दि ट्रस्टी ऑफ मुतावली मॅनेजिंग मेंबर्स कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान शहा दर्गाह वक्फ यांनी बेकायदेशीररित्या सदर मिळकतीवर नाव लावण्याकरिता कामगार तलाठी यांना अर्ज सादर केला आहे.

सदरच्या बेकायदेशीर नोंदीस हरकत घेण्याकरिता विशेष ग्रामसभा घेणे आवश्यक आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यावरून श्री कानिफनाथ देवस्थानच्या इनामी शेतजमीन मिळकतीवरील 7/12 सदरी नावाची नोंद कमी करणे या एकाच विषयावर गावातील हनुमान मंदिरात सरपंच उषाताई चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा पार पडली.

या कारणावरून जातीय वाद होण्याची संभावना आहे. जातीय तेढ निर्माण होऊन गुहा गावचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने तसेच गा्रमपंचायत हद्दीत हजरत बाबा रमजान हे व हजरत बाबा शहा दर्गा हे नाव ग्रामपंचायत दप्तरी कोठेही नोंद आढळत नाही, त्यामुळे श्री. कानिफनाथ देवस्थानच्या मिळकतीवर अन्य कोणतीही नोंद लावू नये, असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या इनामी शेतजमीन उतार्‍यावर काही वर्षांपूर्वी काही लोकांनी अनधिकृतपणे गावाला अंधारात ठेऊन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ स्थापन केले. त्यामुळे सदरचे नाव कमी करण्याचा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पोलीस बंदोबस्तात पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, राहुरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व गावातील वरिष्ठ नेते, महिला, तरुण मुले असा मोठा जनसुमदायाच्या उपस्थितीमुळे ग्रामसभा न भुतो न भविष्यती अशी ग्रामसभा शांततेत पार पडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या