Saturday, April 27, 2024
Homeनगरकानिफनाथ गडावर भाविकांच्या गर्दीचा महापुर

कानिफनाथ गडावर भाविकांच्या गर्दीचा महापुर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे रंगपंचमीच्या यात्रोत्सवास देशभरातील भाविकांच्या गर्दीचा महापुर उलटला. लाखो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले. कानिफनाथांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला. सुमारे पन्नास हजार काठ्यांची रविवारी सकाळपासून गर्दी होऊन सायंकाळपर्यंत मंदिराच्या कळसाला काठ्या टेकवल्या गेल्या.

- Advertisement -

आज नाथांचा संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही नाथ भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी आले होते. गडावर पैठण दरवाजाने वाजत गाजत काठ्या आणून मंदिराला प्रदक्षिणा घालून काठी कळसाला टेकवल्या जात होत्या.

अपेक्षेपेक्षाही अधिक भाविक आल्याने अनियंत्रित गर्दीमुळे सुरक्षा व नियंत्रण यंत्रणा सुद्धा कोलमडल्या. यात्रा चोरांची की भाविकांची असेच चित्र सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत होऊन शेकडो मोबाईल सोनसाखळ्या, पाकीटांची चोरी झाली.

सुगंधी दवना वनस्पतींचे देवाला वाहण्याचे महत्त्व असल्याने दवना विक्री करणारी दुकाने यंदा वाढली. मढीची रेवडी अत्यंत प्रसिद्ध असून सुमारे चारशे टन चपटी व गोल- रेवडी, सुमारे दोनशे टन गोडीशेव, सुमारे शंभर टन फरसाणरची विक्री झाली. यात्रेत डुकरांच्या केसांची विक्री आज सकाळी होऊन दीड हजार रुपये किलो दराने विक्री झाली. मुंगसाचे केस प्राण्यांची कातडी मात्र कोठे आढळले नाही. अनेक भाविक जुनीकाठी तेथेच ठेवून नवी काठी देवाला स्पर्श करून घरी नेतात. यामुळे काठ्यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. वनऔषधी जडीबुटी विक्रेत्यांची यंदा संख्या वाढली. मोरपिसांना सुद्धा यात्रेत मागणी होती. विविध व्यवसाय मिळून एका दिवसात सुमारे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल मढी परिसरात झाली.

एकेरी मार्ग वाहतुकीची नियोजन कोलमडून व रस्त्यावर बसणार्‍या पथारी वाल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली. निवडुंगा मार्ग येण्यासाठी तर तिसगाव पाथर्डी वृद्धेश्वर रस्ता बाहेर पडण्यासाठी नियोजीत करण्यात आला होता. देवस्थान समितीने यंदा दर्शनबारी मध्ये बदल करून एक रांग वाढल्याने दर्शनासाठी वेळ लागला नाही.

देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, सचिव विमल मरकड, सहसचिव शिवजी डोके, विश्वस्त रवींद्र आरोळे, शामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, नवनाथ मरकड, भाग्येश मरकड, गोरक्ष मरकड बाळासाहेब मरकड सर्व विश्वस्तांनी नवरात्र थांबून भाविकांना सेवा दिली. सरपंच संजय मरकड व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन केले.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर यांनी यात्रा व्यवस्थापनावर अत्यंत बारीक लक्ष देऊन नियंत्रण ठेवले. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेकडो एकर जागाही अपुरी

मढी यात्रेसाठी वाहनाची तुफान गर्दी झाली. शेकडो एकर जमीन सुद्धा पार्किंग व भाविकांच्या तंबूसाठी कमी पडली. मढीसह मायंबा व मोहटादेवी याठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी गर्दी असल्याने संपुर्ण तालुका भक्तांनी फुलुन गेल्याचे चित्र होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या