महिलांनी वृक्ष संवर्धनासाठी योगदान द्यावे – कांचनताई थोरात

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान अंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये अकराशे अकरा वटवृक्ष रोपांचे रोपण करण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यामध्ये सर्व महिलांनी अधिक सहभाग घेताना आपला तालुका समृद्ध व हिरवाईने नटलेला करण्यासाठी काम करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांनी केले असून ग्लोबल वार्मिंगच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी वृक्ष संगोपनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

दंडकारण्य अभियान अंतर्गत खांडगाव येथील कपारेश्वर मंदिर येथे झालेल्या वृक्षारोपण व वटपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी सौ. दुर्गाताई तांबे होत्या. तर व्यासपीठावर कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. शरयूताई देशमुख, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. राधाबाई गुंजाळ, उपसरपंच सौ. लक्ष्मीबाई गुंजाळ, सौ. अर्चना सराफ, रमेश गुंजाळ, मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, प्रा. बाबा खरात, गणेश सराफ, वनविभागाचे सचिन लोंढे, श्रीमती कोंढार, कोळी, समन्वयक बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.

यावेळी गावातील सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीत वटवृक्ष रोपांचे रोपण व वटपूजा करण्यात आली. याप्रसंगी सौ. कांचनताई थोरात म्हणाल्या की, दंडकारण्य अभियान हे संगमनेर तालुक्याची ओळख बनली आहे. मागील सोळा वर्षात अनेक उघडीबोडकी डोंगर हिरवेगार दिसू लागली आहे. यापुढेही सर्व महिलांनी आपला तालुका समृद्ध व हिरवा होण्यासाठी काम करावे. वटपौर्णिमा ही महिलांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. वटवृक्ष हा देव वृक्ष आहे, त्याला जास्त आयुष्य असते. ऑक्सीजन देणारा हा वृक्ष असून त्याचे संवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्या म्हणाल्या.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, पृथ्वीचे तापमान सध्या वाढत आहे. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वृक्षारोपण व संवर्धन होय. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत मागील सोळा वर्षांत पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम उभे राहिले आहे. मागील सात वर्षापासून गावोगावी वटवृक्षाची रोपण करण्यात येत आहे. ही सर्व वृक्ष आता मोठी होऊ लागली आहेत. आज प्रत्येक गावात वडाची पूजा होत असून अनेक ठिकाणी वटवृक्षाचे वाढदिवसही साजरे होत आहेत. या सर्व पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

सौ. शरयुताई देशमुख म्हणाल्या, महिला ह्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी करतात. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात महिलांनी सर्व कामे करताना स्वतःच्या आरोग्याकडे ही लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मधुकर गुंजाळ यांनी केले सूत्रसंचालन महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई बालवाडी यांनी केले तर समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.

पर्यावरण संवर्धनाचे सप्तमंत्र

कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पारंपारिक पूजेसहसह महिलांनी पर्यावरण संवर्धनासाठी 1) गावची स्वच्छता, 2) गावची शाळा स्वच्छ सुंदर करत शाळेची जपवणूक, 3) गावातील प्रत्येक मुलाचे शिक्षण, 4) व्यसनमुक्त गाव, 5) एक वृक्षाचे रोपण व संवर्धन, 6) मुलगा मुलगी समानता, 7) मानवताधर्म वाढ हा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र घेऊन सर्व महिला भगिनींना शपथ दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *