Thursday, April 25, 2024
Homeनगरबिबट्याच्या तावडीतून बहिणीने दोघा भावांना वाचविले

बिबट्याच्या तावडीतून बहिणीने दोघा भावांना वाचविले

सात्रळ |वार्ताहर| Satral

धाकट्या बहिणीने आपल्यापेक्षा मोठ्या दोन भावंडाचे बिबट्याच्या तावडीतून प्राण वाचविल्याने या बहिणीचे कानडगाव परिसरात कौतूक होत आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी, रविवार दि.18 जून रोजी राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील श्रद्धा भाऊसाहेब गागरे व तिचे मोठे दोन भाऊ कुणाल व तेजस हे तिघे लोणीहून मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून कानडगावला रात्री मोटारसायकलने येत होते. घराच्या अगदी जवळ येत असताना गिन्नी गवतातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात ते तिघेही मोटरसायकलवरून खाली पडले.

मोटरसायकल तेजस चालवीत असल्याने तो थोड्या अंतरावर जाऊन पडला. काळ्याकुट्ट अंधारात श्रद्धा हिच्यावर बिबट्याने पंजाचा मारा केल्यामुळे ती जखमी होऊन खाली पडलेली होती. पण आपला मोठा भाऊ कुणाल हा बिबट्याच्या अगदी समोर पडलेला होता. अशा या काळ्याकुट्ट अंधारात कोणतेही हत्यार जवळ नसताना प्रसंगावधान राखून कुणाल याने आपला जीव वाचविण्यासाठी बिबट्याच्या अंगावर, डोळ्यावर हातात आलेल्या मातीचा मारा केला. आपला भाऊ बिबट्याच्या समोर पडलेला पाहून जखमी श्रद्धानेही पळत जाऊन त्याच्यावर मातीचा मारा केला. त्यांनतर पुढे अंधारात पडलेला दुसरा मोठा भाऊ तेजस हा पळत आला. त्याने नंतर बिबट्यावर ढेकूळ, दगड यांचा मारा केला. खूप वेळ मोठा आरडाओरड झाल्यामुळे आजूबाजूचे वस्तीवरचे लोक धावत आले. तेवढ्या वेळात बिबट्या तिथून पसार झाला.

वेळेचे भान राखून आपल्या भावाचे रक्षण करणारी श्रद्धा ही खरच आपल्या भावाची पाठीराखण ठरली. आसपासच्या परिसरातून लहान बहिणीने व तिच्या दोघा भावांनी दाखवलेल्या धाडसचे कौतुक होत आहे.

श्रद्धा ही सात्रळच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एफवाय बी.ए वर्गात शिकत आहे. वन अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली व पिंजर्‍याची व्यवस्था केली.

सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर, कार्यालयीन अधीक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे आदींनी श्रद्धा हिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या