Thursday, April 25, 2024
Homeनगरकामिका एकादशीनिमित्त नेवासा येथे लाखो भाविकांचे ‘पैस’ दर्शन

कामिका एकादशीनिमित्त नेवासा येथे लाखो भाविकांचे ‘पैस’ दर्शन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ज्ञानेश्वरीचे रचनास्थान नेवासा येथे कामिका एकादशी यात्रेच्या निमित्ताने पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी ‘पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. दर्शनासाठी पहाटे पासूनच तीर्थक्षेत्र नेवासानगरीत भाविकांची गर्दी झाली होती.

- Advertisement -

पहाटे 4 च्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव नहार व सौ.शीतल नहार, योगेश रासने व सौ. रुपाली रासने, वसंत रासने व सौ. सविता रासने यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य पांडुरंग जोशी यांनी केले.

देवगड दत्त मंदिर संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, प्रकाशानंदगिरी महाराज, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, विज वितरण कंपनीचे उपअभियंता मनोहर पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, देविदास साळुंके, राम महाराज खरवंडीकर, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भैय्या कावरे, शिवा राजगिरे, संदीप आढाव, भाऊराव सोमुसे, गोरख भराट, संतसेवक रामभाऊ कडू पाटील, बदाम महाराज पठाडे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, पत्रकार सुधीर चव्हाण, रमेश शिंदे, गोटू तारडे, अभयकुमार गुगळे उपस्थित होते.

मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ व पंचगंगा सिड्स कंपनीच्यावतीने आलेल्या भाविकांसाठी साबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराकडे येणार्‍या वाटेवर तलवार परीवाराच्या वतीने साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्यावतीने पिण्याचे पाणी व केळी वाटप करण्यात आले.

सुवर्णकार समाजाच्यावतीने संत नरहरी महाराज मंदिरातही भाविकांनी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर मंदीर रस्त्यावर जिल्हा बँकेजवळ स्व. धर्मवीर आण्णाभाऊ लष्करे मित्र मंडळाच्यावतीने चहा व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले, सप्तशृंगी माता मंदिरापाशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने शेंगादाणे वाटप करण्यात आले, ब्राह्मण समाज बांधवानी चहा व राजगीरा लाडू वाटप केले. नेवासा बुद्रुक येथे नारदमुनी भक्त मंडळाच्यावतीने साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले.

फळ विक्रेते यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने भाविकांना रस्त्यावरुन जाण्यासाठी सुकर मार्ग तयार करण्यात आला होता. मुख्य ठिकाणी वाहन पार्किंग करण्यात आली होती. चारचाकी वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय व नेवासा मार्केट कमिटी प्रांगणात व्यवस्था करण्यात आली होती. मुळा सहकारी साखर कारखाना व संत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्नीशमन दल उपस्थित होते.

पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी होती. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासह वै. बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली.

दिंड्यांचे स्वागत

नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, गंगापूर, नगर या भागातील शेकडो दिंड्यांनी येथे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत हजेरी लावली. वारकर्‍यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत करून श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला.

चोख बंदोबस्त

शहरात येणार्‍या माऊली भक्तांच्या सेवेसाठी पोलीस दलाच्यावतीने पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकांत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या नेतृत्वाखाली होमगार्ड जवानांनी निष्काम सेवा दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या