Friday, April 26, 2024
Homeनगरकाकडी गाव अंतर्गत रस्त्यांची पावसाने लागली वाट

काकडी गाव अंतर्गत रस्त्यांची पावसाने लागली वाट

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील काकडी गाव अंतर्गत वाहतुकीच्यादृष्टीने महत्वाचे असलेले अनेक रस्ते गेल्या अडीच वर्षापासून आ. आशुतोष काळे यांच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिलेले आहे. पावसामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अबाल वृध्दासह विद्यार्थ्यांना दैनंदिन कामासाठी अन्यत्र ये-जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची टिका ग्रामपंचायत सदस्य विजय डांगे व सर्व सदस्यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

- Advertisement -

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांच्या त्याचप्रमाणे काकडी विमानतळ विकासासाठी दोनशे कोटी रुपयांच्या वल्गना केल्या आहेत, विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. मात्र त्याचा एक रुपया देखील काकडी अंतर्गत तसेच विविध रस्त्याच्या विकासासाठी आलेला नाही. काकडी अंतर्गत मनेगाव मधला रस्ता, रांजणगाव ऐलमामे वस्ती मल्हारवाडी रस्ता, काकडी गुंजाळ वस्ती रस्ता, वाघ रस्ता, मल्हारवाडी वेस रस्ता आदी रस्त्यांची पावसाने वाट लागली आहे.

या रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, पण आमदारांनी या रस्त्यांच्या कामांना सतत अंगठा दाखविला आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झालेले आहे. विद्यार्थ्यांना याच रस्त्याने शाळेत ये-जा करावी लागते. पण हे रस्ते चिखलाने माखल्याने त्यातून अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अबालवृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी ये-जा करण्यास हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.

तेव्हा आ. आशुतोष काळे यांनी हे रस्ते तातडीने दुरूस्त करावेत, अशी मागणी सरपंच पुर्वा गुंजाळ, उपसरपंच भाउसाहेब सोनवणे, सदस्य दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब मोरे, उषाताई सोनवणे, हिराताई गुंजाळ, सुनिता सोनवणे यांच्यासह स्थानिक रहिवासीयांनी केली आहे.

शिर्डी विमानतळ प्राधिकरणाकडे काकडी ग्रामपंचायतीच्या कराची सुमारे सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याची मागणी ग्रामपंचायतीने वारंवार केली पण ती देखील अद्यापही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत दोनच शाळा खोल्यांची कामे चालू आहे ती पुरेशी नाही. तेव्हा संबंधीत यंत्रणेने याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा याविरूध्द नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असेही विजय डांगे व त्यांच्या सर्व सदस्यांनी शेवटी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या