Friday, April 26, 2024
Homeजळगावविद्यापीठ परिसरात लावणार ट्रॅप कॅमेरे

विद्यापीठ परिसरात लावणार ट्रॅप कॅमेरे

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून परिसरातील निवासस्थानात राहणार्‍या रहिवाशांमध्ये

- Advertisement -

भितीचे वातावरण पसरु नये आणि कोणत्या उपाययोजना करता येतील या बाबत एरंडोलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई आणि वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी सायंकाळी रहिवाश्यांसोबत संवाद साधून समुपदेशन केले. तसेच विद्यापीठ परिसरात लवकरच ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील, असे आश्वासन वनपरिक्षेतत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी दिले.

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात बिबट्याची मादी व दोन पिलांचा वावर आढळून आल्यामुळे भितीदायक वातावरण पसरले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, एरंडोल तसेच उप वनसंरक्षक, जळगाव वन विभाग यांच्याशी विद्यापीठाने पत्रव्यवहार करुन उचित कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडून विद्यापीठ परीसरात प्रत्यक्ष भेटही दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी विद्यापीठ परिसरात राहणार्‍या कुटुंबियांचे वनजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी समुपदेशन केले व रहिवाश्यांनी या परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यायला हवी हे सांगितले.

वनपरिक्षेतत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी या परिसरात लवकरच ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. रहिवाश्यांच्यावतीने अरुण सपकाळे यांनी समस्या मांडल्या. विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात बिबट्याचा वावर आणि विद्यापीठ परिसराची माहिती दिली. यावेळी रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या