Thursday, April 25, 2024
Homeनगरपोलीस निरीक्षक ढुमणे यांची उचलबांगडी

पोलीस निरीक्षक ढुमणे यांची उचलबांगडी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना तातडीने अहमदनगर येथील मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील जोर्वे येथील प्रकरण त्यांना भोवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी मागील महिन्यातच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी आपली कारकीर्द सुरू करून काही दिवसांचा कालावधी झालेला असताना त्यांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात किरकोळ कारणावरून जोर्वे येथील आठ युवकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. एका समाजाच्या युवकांनी धारदार शस्त्रांचा वापर केला होता, या मारहाणीत हे युवक गंभीर जखमी झाले होते.

जोर्वे नाका येथे झालेल्या मारहाणीचे पडसाद दुसर्‍या दिवशी जोर्वे येथे उमटले होते. या घटनेमुळे तालुक्यातील वातावरण तणावाचे बनले होते. या मारहाणीच्या निषेधार्थ संगमनेरात भगवा मोर्चाही काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना पदभार देण्यात आलेला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी संगमनेर तालुक्यातील घटनांकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे. यामुळे संगमनेर येथील आणखी कोणत्या अधिकार्‍याची उचलबांगडी होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या