Saturday, April 27, 2024
Homeनगरसाखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला बंदी

साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला बंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा आकृतीबंध निश्‍चित होईपर्यंत कोणत्याही प्रकारणी नोकरभरती करू नये, असे निर्देश सहकार खात्याने दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणूक होणार्‍या साखर कारखान्यांच्या संचालकांची गोची होणार आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी-कर्मचार्‍यांचा आकृतिबंध कसा असावा याबाबत साखर आयुक्तांनी साखर संचालक (प्रशासन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध निश्‍चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. तसेच त्यांना शेतकर्‍यांच्या एफआरपीची रक्कम वेळेत देणेही अडचणीचे ठरत आहे. काही कारखान्याच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेलेआहे. आणि म्हणून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चित होवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी असे ही या आदेशात म्हंटले आहे.

- Advertisement -

अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी
महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यात आहेत. आगामी काळात नगर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाकडून अनेकदा सभासदांना खुश ठेवण्यासाठी नोकरभरती केली जाते. अशा प्रकारची नोकरभरती झाल्याने कारखान्याचा प्रशासन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. आता अशा होणार्‍या नोकरभरतीवर निर्बंध घालण्यात आल्याने सत्ताधार्‍यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या