Saturday, April 27, 2024
Homeनगरराज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार सौ. दुर्गाताई तांबे यांना प्रदान

राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार सौ. दुर्गाताई तांबे यांना प्रदान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरच्या नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, समाजकारण,शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडतर्फे राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळे येथे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडतर्फे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण अधिवेशनात सौ. दुर्गाताई तांबे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सौ. सुनंदाताई पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ. माधुरीताई भदाणे, अर्जुनराव तनपुरे, अमळनेरच्या अ‍ॅड. ललिता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने धुळे येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण अधिवेशनात हा मानाचा पुरस्कार सौ. दुर्गाताई तांबे यांना शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. दुर्गाताई तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून खेडोपाडी गावोगाव महिलांचे संघटन करुन महिला सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे, मार्गदर्शन,सहलीं बरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानात प्रकल्प प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका संभाळली आहे. त्याच बरोबर जात्यावरील ओव्या संकलित करून त्यांनी केलेल्या पुस्तिकेच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

याप्रसंगी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, हा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिक बंधूंचा असून या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. आपण सातत्याने समाजाच्या विकासासाठी योगदान देत असून यापुढेही काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या