Thursday, April 25, 2024
Homeनगरजयहिंद लोक चळवळीच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन

जयहिंद लोक चळवळीच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

सुदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र राज्याच्यावतीने

- Advertisement -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर 2020 या काळात जागतिक शांतता, सुसंवाद व प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय विशलेषक सॅम पित्रोदा, अमेरिकेचे नेते फ्रँक इस्लाम यांसह आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेली ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

या ग्लोबल कॉन्फरन्सबाबत माहिती देताना आ. डॉ. तांबे म्हणाले, मागील 20 वर्षांपासून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवकांना रचनात्मक कार्याची दिशा देत सुदृढ लोकशाहीसाठी व निरोगी समाजनिर्मीतीसाठी काम होत आहे.

जगातील सध्याची अस्थिरता व भीतीचे वातावरण यावर मात करत जागतिक शांतता, सामाजिक सलोखा व मानवतेच्या वृद्धीसाठी जयहिंद लोकचळवळच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांचा समावेश असलेली ग्लोबल कॉन्फरन्सचे ऑनलाईन आयोजन केले आहे.

यामध्ये शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत ‘महात्मा गांधी, शांतता, सुसंवाद आणि प्रगती’ या विषयावर भारतीय संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांचे सल्लागार व टेलीकॉम विझार्डचे संचालक आणि संशोधक सॅम पित्रोदा, इंडो अमेरिकन नागरी नेते व आयटी उद्योजक फ्रँक इस्लाम, जर्मनीचे राजकीय नेते क्लॉडिया क्रॉफर्ड, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, अमेरिकेतील न्यु जर्सी येथील एडिसनचे महापौर थॉमस लँकी, भारतातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. संदीप वासलेकर, अमेरिकेचे मायकल क्रॉली यांच्या उपस्थितीत या सत्रात परिसंवाद होणार आहे. तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेतील दुसर्‍या सत्रात ‘21 व्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व’ याविषयांवर ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, तुर्कीचे इंग्रजी तज्ञ उगर इरूलकर, ज्ञानेश्वर यवतकर, गार्गी गाडे मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तिसर्‍या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत ‘सुदृढ समाज निरोगी समाज व्यवस्था’ या विषयावर जयहिंदचे संस्थापक आ. डॉ. सुधीर तांबे, औषधतज्ञ डॉ. रवींद्र गोडसे, इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संग्राम पाटील, ओमान देशामधील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. नितू चाबरिया, सबरिना चौधरी, अरिफ रेहमान, डॉ. टायलर व्हर्नन हे मार्गदर्शन करणार आहेत.

तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेतील चौथ्या सत्रात ‘सामूहिक शेती व शाश्वत उत्पन्न’ या विषयावर बारामती अ‍ॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, कृषी विभागाचे सहाय्यक मुख्य सचिव डॉ. सुधीर गोयल, सौ. आदिती अमित देशमुख (लातूर, प्रशासकीय अधिकारी विमलेंद्र शरण, अन्न संधोधनातील डॉ. मुकुंद कर्वे, व्हीट्रीट चेलवन (पाँडेचरी) हे मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पाचव्या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व सामाजिक सुरक्षितता’ या विषयावर संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री कल्पना सरोज, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या फायनान्स ऑफीसर पुजा कराचीवाला, सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, डॉ.क्लारिसा (ऑस्ट्रेलिया), पल्लवी शिंदे (अमेरिका), डॉ. युझोमी यम्मामोटो (जपान), डॉ. हेमा अब्दुल हलीम (जॉर्डन), अ‍ॅड. स्मिता सिंगलकर (नागपूर), प्रियंका वामन (अभिनेत्री) तर रात्री 8 ते 9 या वेळेतील सहाव्या सत्रात ‘लोकशाही’ या विषयावर कन्हैया कुमार, डॉ. कार्लस टर्नर (लंडन), ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, मायकल क्रावली (अमेरीका), ज्ञानेश्वर मुळे, जर्मी केल्म (अमेरीका), हिरालाल पगडाल, केतकी भिसे (लंडन) हे संवाद साधणार आहेत.

ही ग्लोबल कॉन्फरन्स सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार असून जय हिंदच्या https:// www.facebook.com, http://www.facebook.com / jaihindpeoplesmovement/ या फेसबुक पेज व सर्व सोशल माध्यमांवर उपलब्ध असणार आहे.

तरी आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेल्या या प्रथम ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अधिकाधिक तरुणांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक संदीप खताळ, आंतरराष्ट्रीय समन्वयक अशोक खैरनार, आंतरराष्ट्रीय समन्वयक सुरज गवांदे व जयाहिंद लोकचळवळ सर्व विभागांच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या