Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजवळ्यात दारूबंदी करा म्हणणारेच झिंगले..!

जवळ्यात दारूबंदी करा म्हणणारेच झिंगले..!

पारनेर |प्रतिनिधी| Parner

जवळे (ता. पारनेर) येथे नुकत्याच घडलेल्या खून प्रकरणामुळे ग्रामस्थांनी तातडीने दारूबंदी समितीची स्थापना केली. या समितीने लगेचच कामकाज सुरू केले व रविवारी रात्री गावातील दारूविक्री होत असणार्‍या धाब्यांवर छापे टाकले. त्यावेळी त्यांना तिथे गावातील प्रतिष्ठीत दारू पिताना आढळून आले. समितीच्या सदस्यांना पाहताच त्यांनी आपले तोंड दडवत पळ काढला तर काहींनी पुन्हा नाही दिसणार असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisement -

दरम्यान, दारू बंदी समितीच्या सदस्यांनी यावेळी मद्यपींना समज देण्याची भूमिका घेतली. पुन्हा दिसले तर पोलिसांना बोलावून थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पुरावे म्हणून सर्व घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. प्रसंगी ते आम्ही ग्रामसभेत सादर करू अशीही भूमिका समितीने घेतली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी गावातील याच मद्यधुंद पदाधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक पारनेर यांना गावात दारूबंदी करण्यासाठी प्रत्यक्ष भेटून पत्र दिले होते. आज मात्र तेच पदाधिकारी गावातील याच धाब्यांवर मद्य प्राशन करताना आढळले.

जवळे गावात असणारे अधिकृत दारूचे दुकान गेल्या 25 वर्षांपूर्वी बंद केले होते. तेव्हापासून पुढे बरेच दिवस गावात दारूबंदी लागू होती. महिलांनी चार वर्षांपूर्वी गावात दारूबंदीसाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे दारूबंदीसाठी जवळे गाव नेहमी पुढाकार घेताना दिसते. परंतु अलिकडच्या काळातील गावकारभारी मात्र यास फारसे अनुकुल नाहीत हे कालच्या घटनेवरून अधोरेखीत होते.

माजी सरपंच, आजी-माजी चेअरमन, उपसरपंच, सरपंच पती, तंटामुक्तीचे पदाधिकारी, आजी-माजी पंचायत सदस्य व सदस्य पती राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित बागायतदार यावेळी मद्य रिचवत असल्याचे दारू बंदी समितीला आढळून आले. यावरून गावात समाजासमोर दिवसा दारूबंदीची मागणी करणारे यांचे मात्र दारूसाठी रात्रीस खेळ चाले हे दिसून आले. जवळे दारूबंदी समितीचे अध्यक्ष रायचंद आढाव यांच्या अध्यक्षतेखाली धाब्यांवर छापा मारण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या