जामखेडच्या वारे खुनाचा गुन्हा उघड

jalgaon-digital
3 Min Read

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री शिवारात गणेश शिवाजी वारे या 30 वर्षीय तरूणास विवस्त्र करत जबरदस्त मारहाण करून खून करणार्‍या दोन आरोपींपैकी मुख्य आरोपी दीपक रंजीत भवर यास अवघ्या 14 दिवसांत अटक करण्याची कामगिरी जामखेड पोलिसांनी केली आहे. 5 नोव्हेंबरला भवरला अटक करून जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 10 तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. तसेच दुसर्‍याही अरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्यासही लवकरच ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक कसून तपास करीत असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले, जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री गावचे शिवारात कापसाच्या जुन्या जिनींग समोर 24 ऑक्टोबर रोजी सकाळी अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाच्या एका पुरुषाचा नग्न अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. मयताचे नाव गणेश शिवाजी वारे (रा. संगमजळगांव ता. गेवराई) असे आसल्याचे निष्पन्न झाले. या मयत तरुणास अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाकरीता शरिरावर विविध ठिकाणी मारहाण करून खून केला होता. याप्रकरणी मयताचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्याकडे देण्यात आला होता. आरोपींना शोधण्यासाठी स्वतंत्र दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. याबाबत आजूबाजूचे साक्षीदार तसेच गुप्त बातमीदार यांच्या मार्फत आरोपींचा शोध घेत असताना मयत गणेश वारे याचा खून आरोपी दीपक रंजीत भवर (रा. सावरगाव, ता. जामखेड ) याने केला असल्याची बातमी मिळाली. यावरून 5 नोव्हेंबरला तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या पथकाने साकत फाटा परीसरातून आरोपी भवर यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने सदरचा खून केल्याची कबुली दिली.

मागील काही दिवसांपूर्वी गणेश वारे याने आरोपी भवर याचा मोबाईल चोरी केला होता. 23 ऑक्टोबरला सायंकाळी मयत वारे हा मोहा फाट्यावर दिसल्याने मुख्य आरोपी भवर व त्याचा एक साथीदार दोघांनी त्यास मारहाण करीत स्कुटीवर बसवून धोत्री शिवारातील जिनींगचे गेटसमोर घेऊन जाऊन व नग्न करून त्यास चोरलेला मोबाईल कोठे ठेवला आहे. याची विचारणा केली, मात्र तो काहीच सांगत नसल्याच्या रागातून काठ्या व होज पाईपने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा या मारहाणीत मृत्यू झाला.यावरून खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी उघडकीस आणली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *