Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजलपरिषदचा निर्धार 'गाव तेथे वनराई बंधारा'

जलपरिषदचा निर्धार ‘गाव तेथे वनराई बंधारा’

हरसूल । वार्ताहर Harsul

‘ ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, फक्त एक धाव पाण्यासाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन जलपरिषदेने Jalparishad आतापर्यंत विविध समाजहीत उपक्रम राबविले आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गाव – पाड्यामध्ये उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईवर वनराई बंधारे Forest Dam उपयुक्त ठरत असल्याने जलपरिषदेने पुन्हा एकदा ‘गाव तेथे वनराई बंधारा’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अविकसनशील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खडकओहळ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या जांबूनपाडा येथून करण्यात आली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तसेच दिंडोरी तालुक्यातील अनेक गाव पाड्यामध्ये उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी तर वणवण भटकंती बरोबर ग्रामस्थांना पाण्यासाठी जागता पहारा देण्याची वेळ येते. यामुळे ग्रामस्थांना केवळ पाण्यासाठी दाहीदिशा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक विहिरी,पाझरतलाव तळ गाठत असल्याने पाण्याच्या शोधत पशुपक्षी, जनावरे, प्राणी यांना भटकंती करावी लागत आहे. ही बाब ओळखून जलपरिषदेने मागील वर्षीच्या प्रमाणेच वनराई बंधारा मोहीम हाती घेतली आहे.

आयतागत वाहून जाणारे पाणी वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून अडविण्यात येत असल्याने उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाई मात करण्यासाठी मोठी मदत होत आहे.रिकाम्या गोण्यात माती भरून वाहणार्‍या पाण्यात आडवा बांध भरण्यात येत असून त्यात मुबलक पाणी साचून जमिनीत मुरले जाते. यामुळे शेजारी असणार्‍या विहिरी, ओहळ, नाले यांना दोन – तीन किंवा अधिक महिने पाणी झिरपत असल्याने या वनराई बंधारे अधिकच उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधार्‍यांची निर्मिती करण्यात येत असल्याने व माती मिश्रीत असल्याने वनराई बंधार्‍यांची जडण अधिक मजबूत होत आहे. यामुळे लाखोंच्या सिमेंट बंधार्‍याच्या पाणीसाठ्याच्या आलेखात वनराई बंधार्‍याची पाणीपातळी मजबूत रूप धारण करीत आहे. या मोहिमेत ग्रामस्थ श्रमदानासाठी पुढे येत आहे.

यावर्षी जलपरिषदेने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तसेच दिंडोरी तालुक्यात 200 हुन अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प ठेवला असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाड्याच्या जांभळा या जांबूनपाडा नावाच्या पाड्यापासून प्रारंभ करत श्रीगणेशा केला आहे.

यावेळी जलपरिषद मित्र परिवाराचे मार्गदर्शक देविदास कामडी, कवी साहित्यिक देवचंद महाले, वन परिमंडळ अधिकारी नवनाथ गांगुर्डे, जलदूत नितीन गांगुर्डे, संजय गवळी, अनिल बोरसे, पोपट महाले, अशोक तांदळे,प्रकाश पवार, ज्ञानेश्वर खुताडे, पोलीस पाटील विठ्ठल गावीत, वैशाली धनगरे, भागीबाई खुताडे, अलका धनगरे, रमी बरफ, अनुसया किरकिरे, वेणू धनगर, मथिबाई धनगरे, पिंटी वड, मीरा खुताडे, सुरेखा बोगे, गुलाब धनगरे, सुभाष खुताडे, कृष्णा किरकिरे, सुरेश राऊत, सीताराम धनगरे, हिरामण बोगे, भरत वड, कैलास खुताडे, मोहन बोगे, गुणाजी बरफ, देविदास धनगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर, पेठ,सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई मोठी शोकांतिका आहे. या तालुक्यामध्ये वनांचे प्रमाण तसेच जगली प्राण्यांचे वास्तव अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र उन्हाळ्यात मानवाबरोबर पशु पक्ष्यांना, जनावरे, प्राणी यांना भटकंती करण्याची वेळ येत आहे.वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात का होईना ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाणीटंचाईवर मात करीत आहे. अनेक ठिकाणी वनराई बंधारे दशक्रिया विधी, जनावरे,कपडे धुण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

पोपट महाले, मिशन जनक जलपरिषद मित्र परिवार

गोव्याहून 600 रिकाम्या गोण्या

जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेल्या मिशन गाव तेथे वनराई बंधारा या मोहिमेसाठी भारतीय खाद्य निगम गोवा, मंडळ प्रबंधक घनश्याम महाले यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवीत 600 हुन अधिक रिकाम्या गोण्या पाठविल्या आहे. यामुळे संकल्पित असलेल्या 200 वनराई बंधार्‍याच्या संख्येचा आलेख उंचावणार आहे.

अनेक गावांच्या नदी – ओहळावर लहान मोठे सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहे. मात्र निकृष्ट काम आणि त्यात पूर्णतः साचलेले गाळ यामुळे हे बंधारे शोभेचे बाहुले बनले आहे. त्यात अनेक बंधार्‍यांना झडपे नसल्याने काहीच उपयोग होत नाही, मात्र वनराई बंधारे त्यापेक्षा लाख मोलाचे पाणी अडवीत आहे. आम्ही ग्रामस्थ या मोहिमेत श्रमदानासाठी हिरारीने सहभाग नोंदवीत आहे.

अनुसया किरकिरे, जांबूनपाडा, ग्रामस्थ

- Advertisment -

ताज्या बातम्या