जलजीवनमध्ये 901 योजनांना मंजुरी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात तब्बल 901 नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. आतापर्यंत त्यातील 379 योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 5 गावात या योजनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 1 हजार 8 कोटींची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली.

ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून केंद्र व राज्य शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून लहान मोठ्या 718 पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. आता जलजीवन मिशनद्वारे याच योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी केली जाणार आहे. 258 नवीन योजना व 643 योजनांची पूनर्जोडणी अशा एकूण 901 योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहेत. सद्यस्थितीत 901 पैकी 379 योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 104 योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

एकट्या अकोल्यात 102 योजना

एकूण 901 पैकी सर्वाधिक 102 योजना अकोले तालुक्यात आहेत. त्यासाठी 148 कोटींची तरतूद आहे. त्यानंतर कर्जत तालुक्यात 98, पारनेर तालुक्यात 92, तर श्रीगोंदा तालुक्यात 95 योजना मंजूर आहेत. तर सर्वात कमी 32 योजना राहाता तालुक्यात आहेत.

तालुकानिहाय मंजूर योजना

अकोले 102, जामखेड 72, कर्जत 98, कोपरगाव 54, नगर 45, नेवासा 52, पारनेर 92, पाथर्डी 33, राहाता 32, राहुरी 66, संगमनेर 79, शेवगाव 37, श्रीगोंदा 95, श्रीरामपूर 44 यांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *