Friday, April 26, 2024
Homeनगरजळगावात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

जळगावात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

चितळी |वार्ताहर| Chitali

राहाता तालुक्यातील जळगाव येथे बुधवारी रात्री गावालगत राहत असलेल्या बाजीराव रामभाऊ चौधरी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत शेळी ठार केली तर दुसरी जखमी झाली आहे. घरातील मंडळी जागी झाल्याने बिबट्याने तेथून पलायन केले. बिबट्याच्या भितीने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले असून वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

जळगावमध्ये सध्या पिके जोमदार असल्यामुळे तसेच हा भाग उसाचा आगार व पशुधनाच्या चारा पिकांमुळे बिबट्यास लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे. या भागात 3 ते 4 बिबटे व त्यांची पिल्ले आहेत असे प्रत्यक्षदर्शी शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. गावाच्या चारही बाजूला बिबट्याचा वावर आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी गोदावरी कालव्याद्वारे ओढे-नाले यामध्ये पाणी असल्यामुळे सध्या पिके जोमात आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित आहे. येथे पाळीव शेळ्या-मेंढ्यांचे प्रमाण अधिक आहे.

काही दिवसांपूर्वी सतीश सुरेश चौधरी हे इंजिनिअर असलेले शेतकरी यांच्याकडील कोंबड्यांवर बिबट्याने ताव मारला. कोंबड्याच्या संरक्षणासाठी जाळी असूनही बिबट्यावर जाळीवरून उडी मारत कोंबड्या फस्त केल्या. सलग तीन ते चार दिवस बिबट्या याठिकाणी येत होता. आता बिबट्याने आपला मोर्चा त्याच रस्त्यावर राहत असलेल्या बाजीराव चौधरी यांच्या शेळीचा बुधवारी रात्री फडशा पाडला. तर दुसरी शेळी जखमी केली. सुदैवाने शेळ्यांच्या ओरडण्याने त्यांना जाग आल्याने त्यांनी बॅटरी चमकविल्यानंतर बिबट्याने तेथून पलायन केले.

त्याच रात्री वाघ वस्तीजवळील श्री. कापसे यांच्या गोठ्यात रात्री 1 वाजेच्या सुमारास बिबट्या दाखल झाला. मात्र त्यांच्याकडे शिंग असलेल्या गायी असल्यामुळे बिबट्याला तेथील शेळ्यांवर चाल करता आली नाही. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या शेळ्या बचावल्या आहेत. या ठिकाणी बिबट्याने दुसर्‍यांदा हल्ला केला. मात्र त्याला त्यात यश आले नाही. वन विभागाने सध्या महेश जबाजी चौधरी यांच्या वस्तीवर बिबट्या वारंवर दर्शन देत असल्याने तेथे पिंजरा लावला आहे. मात्र गावात अजून एका पिंजर्‍याची गरज असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या