Wednesday, May 8, 2024
Homeजळगावकारवाईपोटी 20 लाखांची वसुली

कारवाईपोटी 20 लाखांची वसुली

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून अटी व शर्तींचे उल्लंघन करणार्‍या दुकानदार, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत…

- Advertisement -

आज अखेर 20 लाख 50 हजाराची वसुली मनपा प्रशासनाने केली आहे. जिल्हा प्रशासन व आपत्ती विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अनलॉकडाउन सुरू झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झालेले आहेत. नागरिक, दुकानदार यांना वारंवार सूचना, अटी व शर्ती लादूनही नागरिक याची अंमलबजावणी करीत नसल्याचे उघडकीस आले आहे.

या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तींचे बंधन घालून दिले आहे. या अटी व शर्तींच्या अधीन राहून मनपा प्रशासन शहरात अनलॉकडाउन सुरू झाल्यापासून कारवाई करीत आहे.

सोशल डिस्टन्स न पाळणे, विना मास्क फिरणे, सार्वजनिक जागी थुंकणे, अंतर न राखणे या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने मनपा प्रशासनातर्फे विविध भरारी पथके तैनात करण्यात येवून ही कारवाई शहरात करण्यात येत आहे. प्रभाग समित्या एकूण 4 आहेत. या प्रभाग समितींच्या माध्यमातून ही पथके शहरात फिरुन दंडात्मक कारवाई करीत आहेत.

अटी व शर्तींचा उल्लंघन केल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकरीता मनपा प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करुन ठोस अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दंडात्मक वसुली याप्रमाणे…

नियमांचे उल्लंघन केल्याने आजअखेर 318 दुकाने सील करण्यात आली होती या अंतर्गत 18 लाख 20 हजाराची वसुली करण्यात आली, मास्क न लावणे यासाठी 164 नागरिक दोषी आढळले असून त्यांचेकडून 83 हजार 500 रुपये वसुली करण्यात आली, सार्वजनिक जागी थुंकणे यासाठी 133 नागरिकांना जबाबदार धरण्यात आले व त्यांचेकडून 10 हजार 300 रुपयेची दंडात्मक कारवाई करण्यात आली, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यात 20 दुकानदार दोषी आढळून आले त्यांचेकडून 23 हजार 500 रुपयेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तर इतर वेगवेगळ्या कारणास्तव 119 नागरिक दोषी धरण्यात आले असून त्यांचेकडून 54 हजार 950 रुपयेची दंडात्मक कारवाई करीत वसूल करण्यात आले. असे एकूण 20 लाख 45 हजार 50 रुपयेची आजअखेर दंडात्मक कारवाईच्या रकमेची वसुली करण्यात आली.

नागरिकांच्या गर्दीैमुळे प्रादुर्भाव

अनलॉकडाउन सुरू झाल्यापासून नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत आहेत. शहरातील व्यापारी संकुले, बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत. यामुळे बाहेर विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे नागरिक तसेच दुकानदार यांना गांंभीर्य नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे.

तरी शहरातील दाणा बाजार, सुभाष चौक, महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, स्वातंत्र्य चौक ते नेहरु पुतळा तसेच बळीराम पेठ, शनिपेठ या भागात मोठी गर्दी असते. तसेच ठिकठिकाणी बाजारपेठा यातही गर्दी असते. तरी मनपा प्रशासनातर्फे एकाच ठिकाणी गर्दी होवू नये, गर्दी विभागली जावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी भाजीबाजार सुरू केले आहेत.

मात्र नागरिक या इतर ठिकाणी भरलेल्या भाजी बाजारात जात नाहीत, ते नेहमीच्या ठिकाणी गर्दी करतात तसेच हातगाडी धारक, भाजीपाला विक्रेते हेही अन्य ठिकाणी जाण्यास नाखूश असतात. तसेच फिरते विक्रेते हेही खबरदारी घेत नाहीत, तरी वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या