Friday, April 26, 2024
Homeजळगावबालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास 14 वर्षाची शिक्षा

बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास 14 वर्षाची शिक्षा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भडगाव तालुक्यातील वाडे येथील 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम आरोपी सुभाष हरचंद महाजन, (वय 55) यास 14 वर्षाची सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश आर. जे. कटारीया यांनी गुरुवारी ठोठावली आहे.

- Advertisement -

भडगाव तालुक्यातील वाडे येथे दि. 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आरोपी सुभाष हरचंद महाजन याने पिडीत 11 वर्षीय बालिकेस दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिचेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी भडगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद

दिली होती. त्यानुसार गुर नं. 160/2016 भा.दं.वि. कलम 376 (2) (आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4 व 5 अन्वये आरोपी सुभाष महाजन याच्याविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रय परदेशी यांनी केला व दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज जळगाव सत्र न्यायालयाचे न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायासनासमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले.

यात पीडित अल्पवयीन मुलीची साक्ष ही खुप महत्वपूर्ण ठरली. मे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 376 (2) (आय) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 3, 4, 5(एम) व 6 अन्वये दोषी धरलेले आहे. या कामी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता आर. बोरसे यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद करत आजोबा सदृश माणसाकडून नातीच्या वयाच्या लहानग्या बालिकेसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणूसकीच्या छबीला काळीमा फासणारे असल्याने आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असाही युक्तिवाद केला.

न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे जळगाव न्यायालयाने आरोपीस दोषी धरुन आरोपी सुभाष हरचंद महाजन यास भादंवि कलम 376(2)(आय) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 3, 4, 5(एम) व 6 अन्वये 14 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावलेली आहे. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता आर. बोरसे यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या