जिल्ह्याच्या 45 लाख लोकसंख्येचा भार फक्त एका औषध निरीक्षकावर

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात तीन औषध निरीक्षक व एक सहाय्यक औषध आयुक्त अशी चार पदे मंजूर असतांना देखील गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जिल्ह्यातील 45 लाख लोकसंख्येचा भार फक्त एका औषध निरीक्षकावर सोपवण्यात आला आहे.

अन्न औषध प्रशासन विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता आहे या संदर्भात अन्न औषध प्रशासन उपायुक्तांकडून माहिती घेतली असून गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाकडून अनेक विभागात बदली प्रक्रिया राबवणे सुरू आहे. आगामी काळात रिक्त असलेले पद लवकरात लवकर भरले जातील या संदर्भात शासन स्तरावर निश्चितच पाठपुरावा करण्यात येईल.

अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

एकीकडे तासातासाला माणसे मरत आहेत तर दुसरीकडे जीवघेण्या कोरोनापासून बचावासाठी लागणार्‍या रेमेडीसिवीर या औषधासाठी नातेवाईकांना दारोदार भटकंती करावी लागत असतांना औषध विभागावर नियंत्रण ठेवणार्‍या निरीक्षकांचीच पदे रिक्त असल्याचे भयंकर वास्तव ‘देशदूत’ने जाणून घेतलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनारुग्ण दिवसाला सापडण्याचा विक्रम जळगाव जिल्ह्याने केला आहे. त्याबरोबरच देशाच्या मृत्यूदराइतके मृत्यू जळगावात होत असल्याचे देखील गेल्या कालावधीत घडले आहे.

कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर असतांना कोरोना रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनपासून औषधांचा तुटवडा देखील जळगाव जिल्हा अनुभवत आहे.

महामारीच्या काळात रुग्णांना लागणारा औषधसाठा आणि त्या संबंधित बाबी वेळेच्या वेळी पोहोचल्या पाहिजेत अशी किमान माफक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार लोकशाहीत नागरिकांना असतांना अन्न औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार मात्र नागरिकांना किमान अपेक्षांपासून वंचित ठेवत आहे.

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता अन्न औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यासाठी तीन औषध निरीक्षक व एक सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पदांना मंजुरी असतांना कोरोनाचा भयंकर काळ सुरू असतांना जून महिन्यात जळगाव येथील तिघा औषध निरीक्षकांची व सहाय्यक आयुक्तांची देखील प्रशासनातर्फे बदली करण्यात आली.

त्यानंतर मात्र तिघा निरीक्षकांची बदली करुन एकाच निरीक्षकाला जळगावात नियुक्ती देण्यात आली तर निरीक्षक दर्जाच्या एका अधिकार्‍याकडे सहाय्यक आयुक्तांचा पदभार देवून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा भार एकाच व्यक्तिकडे सोपवण्यात आल्याने त्या अधिकार्‍याची अवस्था देखील ना घर का ना घाटका… अशी झाली आहे.

औषधांचा पुरवठा वेळेवर करण्यासोबतच कोविड रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्यापासून प्लाझ्मा वितरणावर नियंत्रण ठेवणे, न्यायालयीन कामकाजाला हजेरी लावणे अशी विविध कामे एकाच निरीक्षकाला करावी लागत आहेत.

…तर मोठी किंमत चुकवावी लागेल

एकाच औषध निरीक्षकावर संपूर्ण जिल्ह्याचा भार असल्यामुळे अचानक काही अनपेक्षित घटना घडल्यास जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ होणार असून याची मोठी किंमत अन्न व औषध प्रशासनाला चुकवावी लागणार आहे.

असे असतांनाही झोपेचे सोंग घेतलेल्या अन्न औषध प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात दिसत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *