वरखेडे लोंढे बॅरेजमुळे होणार जलक्रांती

jalgaon-digital
5 Min Read

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सुरु झाले होते. महायुती शासनाच्या काळात त्यास गती मिळाली. लवकरच ते पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. चाळीसगावपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरखेडे गावालगत हा प्रकल्प उभाराला जात आहे. गिरणा नदीवर होत असलेल्या प्रकल्पामुळे चाळीसगाव परिसरातील नव्हे, तर भडगाव तालुक्यातील काही भागाचा पाणी प्रश्न कायमाचा मार्गी लागणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु होण्यासाठी माजी आमदार राजीव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केल्याने प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्यांच्याच कार्यकाळात सन 2014 मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वरखेडेलोंढे बॅरेज प्रकल्पालाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळेस भरीव निधी मिळवून धरणाच्या कामाच्या पायभरणी कामास शुभारंभ झाला होता. त्यानतंर माजी आमदार तथा विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आज धरणाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे चित्र असून नव्या वर्षात (2021) हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. यामुळे चाळीसगाव तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. ह्या प्रकल्पात लवकरच पाणी आडविण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे…

वरखेडे-लोंढे प्रकल्पाचा सद्यस्थितीत केंद्राच्या बळीराजा संजीवनी योजनेत समावेश करण्यात येवून 526 कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने मिळाली. 2014 नंतर वरखेडे धरणासाठी संपादित होणार्‍या वनजमिनीचा मोबदला 15 कोटी 16 लक्ष अदा करण्यात आला. तर 2015 शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता. प्रकल्पाचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल 526 कोटी किमतीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

प्रकल्पाचे बांधकाम दि.14/11/2017 रोजी सुरु करण्यात आले असून प्रकल्पाच्या साईटवर संपूर्ण अत्याधुनिक मशिनरी काम चालू आहे. तसेच पावसाळ्यात व नदीला आवर्तन सुरू असताना देखील काम सुरू राहण्यासाठी अत्याधुनिक शीट फाईल तंत्रज्ञान प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात आहे. केंद्र शासनाच्या बळीराजा कृषी संजीवनी योजनेत समाविष्ठ होण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या वडोदरा कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मंजुरी मिळून 405 कोटी इतका भरीव निधी प्रकल्पास प्राप्त झाला आहे.

वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्प चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पावर वाळू, खडी, पाणी जागेवरच उपलब्ध असल्याने शासनाचा हा खर्च वाचला आहे. सर्व आवश्यक ती यंत्र सामुग्री सध्या प्रकल्पावर आलेल्या आहेत. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 2017-18 मध्ये वरखेडे-लोंढे धरणासाठी जलसंपदा विभागामार्फत उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली होती. सन 2014-15 (10.24 कोटी), 2015-16 (19.54 कोटी), 2016-17 (13 कोटी व 15 कोटी (अतिरिक्त), 2017-18 (40 कोटी), (2018 -19 (20 कोटी), 2019-20, 22.94 (नाबार्ड 80 कोटी) असा एकूण – 102.94 कोटींचा निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे. वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्प गिरणा नदीवर वरखेडे बु. या गावापासून एक किलोमिटर व चाळीसगाव पासून 25 किलोमीटर अतंरावर आहे. या प्रकल्पास आवश्यक असणार्‍या जमिनीस पर्यावरण व वनमंत्रालय, भारत सरकार, पर्यावरण भवन, आदिनी मान्यता दिली आहे.

या धरणासाठी धरण पाया व बुडीत क्षेत्रासाठी एकूण 787 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. यात खाजगी जमीन 289.56 हेक्टर, सरकारी जमीन 402.49 हेक्टर, वनजमीन 094.95 हेक्टर आहे. मुख्य धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी 21.24 हेक्टर जमीन सरळ खरेदी पध्दतीने खरेदी करुन धरणाचे काम सुरु करण्यात आले. धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 5936.28 चौ.की.मी. आहे. तर मुक्त पाणलोट क्षेत्र 0295.26 चौ.कि.मी इतके आहे. ह्या प्रकल्पामुळे 11785 हेक्टर हे सिंचनाखाली येणार आहे. तसेच पाण्याचा नियोजित वापर 39.36 द.ल.घ.मी. (01.40 टी.एम.सी.) आहे. तर प्रकल्पाची साठवण क्षमता 35.58 द.ल.घ.मी. (1.26 टी.एम.सी.) आहे. उपयुक्त जलसाठा 34.77 द.ल.घ.मी(1.23 टी.एम.सी.) आहे. तर मृतसाठा 0.82 द.ल.घ.मी. (0.03 टी.एम.सी) इतका आहे. वरखेडे-लोढे धरण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील 7 हजार 540 हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल.

वरखेडे धरण हे मातीचे व व्दारसहीत सांडवा प्रकारचे आहे. धरणाची एकूण लांबी 0730 मीटर आहे. माती धरण महत्तम उंची 12.60 मीटर, दगडी धरण महत्तम उंची 35.77 मीटर, उत्सारीत भागांची लांबी 246 मीटर, दरवाजांचा आकार 15 मी 12 मीटर आहे. दरवाजांची संंख्या 13 नग आहे. बुडीत क्षेत्र 787 हेक्टर, संकल्पती पूराचा विसर्ग हा 14470 घनमीटर/सेकंद आहे. तर उजव्या कालव्याची लांबी 38 कि.मी. आहे.

धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावे

वरखेडे धरण हे चाळीसगावसाठीच नव्हे तर शेजारील भडगांव तालुक्याासाठी देखील वरदान ठरणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील 20 गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. तर भडगांव तालुक्यातील 11 गांवे सुजलाम-सुपलाम होणार आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, दसेगाव, भोरस बु, वडगाव लांबे, रहीपुरी, बोरखेडा बु, तरवाडे, न्हावे, ढोमणे, रशीद, टेकवाडे खु, टेकवाडे बु, वडाळा-वडाळी, डामरुण, वाघळी, हिंगोणे, करगांव, परशुराम नगर, पिंप्री खु, चिंचखेडे आदि गावांचा समावेश आहे. भडगाव तालुक्यातील मळगांव, तांदुळवाडी, उंबरखेड, भोरटेक, बामरुड, लोण पिराचे, कनाशी, कजगांव, पासर्डी, वाडे, गोंडगांव ही गावे सिंचनाखाली येणार आहेत. तसेच धरणाच्या बुडीत क्षेत्रात चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बु, वरखेडे खु, तामसवाडी, उपखेड, पिलखोड आदि गावाच्या शेतजमीनींचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *