Friday, April 26, 2024
HomeUncategorizedरांजणी परिसर होतोय रेडझोन

रांजणी परिसर होतोय रेडझोन

जामनेर तालुक्याच्या पूर्वेकडील भाग हा अत्यंत उपेक्षित असा भाग आहे. खान्देश, विदर्भ, मराठवाड्याच्या सीमे लगतची गावे रांजणी, कापुसवाडी, गोरनाळे, नांद्राहवेली, बेटावद बुद्रुक, बेटावद खुर्द, मोयखेडा दिगर, देवळगाव ही गावे पर्जन्यमानाच्या हिशोबाने सदा दुष्काळी व कोरडवाहू आहे. या भागातील जमीन मध्यम काळी कसदार असली तरी हमखास पाण्याचीची उपलब्धता नसल्याने शेती ही निसर्गावरच अवलंबून असते. झालेल्या सर्वे नुसार रांजणी परीसर हा रेडझोन मध्ये आहे, या वर्षी तर कमी पाऊस पडला की शेतातून पाणी बाहेर वाहीले नाही. नाले पावसाळ्यात कोरडे ओस होते. इतरत्र पडलेल्या पावसामुळे सुर प्रकल्प भरला पण सर्व परीसर मात्र कोरडा राहिला. यावर्षी परीसरात नगण्य असा रब्बी हंगाम आहे. त्यात सुध्दा रोगराई दुषीत वातावरण यामुळे पिक खराब होत आहे.

या परीसराचा कायापालट होईल या दृष्टीने 1999 मध्ये कापूसवाडी धरणाचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात करण्यात आली. परंतु अनेक अडचणीमुळे हा प्रकल्प तब्बल 11 वर्षानंतर 2010 मध्ये पाणी अडवून पूर्ण झाला. या धरणाचा उजवा कालवा सुमारे 17 किलोमीटर लांबीचा, याचे काम सन 2005 मध्ये सुरू होऊन अद्यापही तो अपूर्ण स्थितीतच आहे.

- Advertisement -

तीन वेळा या पाटाच्या कामाची सुधारित मंजुरी घेण्यात आली तरी अद्याप गेल्या 14 वर्षां मध्ये या पाटातून पाणी वाहिले नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. कापुसवाडी गोरनाळे रांजणी बेटावद बुद्रुक बेटावद खुर्द देवळगाव या शिवारातील शेकडो एकर जमीन या पाटामुळे खोदली गेली, रांजणी गावाला या पाटाचा वळसा असून या पाटातून पाणी गेल्यास गाव सुजलाम सुफलाम झाले असते, परंतु गावकर्‍यांचे स्वप्न ते स्वप्नच राहिले.

गेले 14 वर्षात या पाटाने पाणी वाहिले नाही. त्यामुळे हा भाग पाण्यापासून वंचित राहिला. या पाटा खाली सुमारे 900 हेक्टर जमीन भिजणार होती, परंतु याचे काम अपूर्ण असल्याने पाणी या पाटाने सुटले नाही. सूर प्रकल्पाचे काम काळ्या दगडा पर्यंत खोदकाम होऊन काळ्या मातीने पाया भरला गेल्यामुळे वरुन येणारे पाण्याचे झरे कापले जाऊन खालील भाग हा पाण्यापासून वंचित झाला.

आधी थोड्या फार चालणार्‍या विहिरी या धरणाच्या कामामुळे आटल्या. या धरणा पासून काही ठराविक सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व मोजके शेतकरी वगळता कोणालाही पाहिजे तसा फायदा झालेला नाही. पाटाचे काम पूर्ण करून या खाली असलेली जमीन ओलीता खाली आणावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. त्याच प्रमाणे या धरणातून पाईप लाईनद्वारे पाणी घेऊन ते शेतीला द्यावे अशी मागणी कापुसवाडी, गोरनाळे, रांजणी, बेटावदबु॥, खु॥, देवळसगाव व परिसरातील शेतकरी करीत आहे.

रस्त्यांची दुरवस्ता

जामठी-रांजणी- कापुसवाडी हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने फारच अरुंद आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यावरुन शेकडो वाहने ये जा करीत असतात. अरुंद रस्त्यामुळे व साईड पट्टी नसल्याने अनेक वाहने उलटून अपघात होत असतात. लवकरात लवकर हा रस्ता मजबुतीकरण, रुंदीकरण करून परिसरातील दळणवळणाची समस्या सोडवावी. विदर्भाला कमी अंतरात व कमी वेळेत जोडणारा रांजणी ते महाळुंगी रस्ता खडीकरण व डांबरीकरण त्वरीत व्हावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या