Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयभाजपचा आमदार,खासदार सोडा; कार्यकर्ताही पक्ष सोडणार नाही !

भाजपचा आमदार,खासदार सोडा; कार्यकर्ताही पक्ष सोडणार नाही !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भाजप हा व्यक्ती केंद्रीत पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष वाढतच आहे.

- Advertisement -

भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार सोडा, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात भाजप कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक होते.

यवेळी विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, विभागीय संघटक अ‍ॅड.किशोर काळकर, माजी आमदार चैनसुख संचेती, अशोक कांडेलकर, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र फडके, विशाल त्रिपाठी आदी मान्यवर बैठकीस उपस्थित होते.

बैठकीनंतर माजीमंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला़ सात-आठ मुख्यमंत्री सुद्धा भाजप सोडून गेले आणि परत आले. मात्र, पक्षाला काही फरक पडला नाही. उलट भाजप पक्ष वाढतोय, असेही आमदार महाजन यांनी एकनाथराव खडसेंच्या पक्षांतराबाबत सांगितले. भाजप हा पक्षनिष्ठा आणि विचारनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे, त्यामुळे कुणाच्या मागे नव्हे पक्षाच्या मागे गर्दी राहणार आहे़ कुणाच्या जाण्याचे पक्ष थांबला नसल्याचा पुनरूच्चार आमदार महाजन यांनी यावेळी केला़ तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीतही त्यांनी राज्यसरकावर टीका केली.

जनसंपर्क, आत्मनिर्भर अभियान राबविणार

जळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर अनेक बैठका झाल्या असून आगामी काळात जनसंपर्क व आत्मनिर्भर अभियान राबविण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा व्हावी, यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे़ यात शेतकर्‍यांंच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली असून जिल्ह्यातील अनेक प्रश्न कार्यकर्त्यांकडून जाणून घेत आहोत. जिल्ह्यात जनसंपर्क व आत्मनिर्भर अभियान राबविण्यात येणार असल्याचे माजीमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले़ जळगावात तीन तास कोअर कमिटीची बैठक चालली.

मोठे आंदोलन जिल्हास्तरावर उभारणार

जिल्ह्यात केळी पिक विम्याचे शेतकर्‍यांंनी पैसे भरले आहे़ मात्र, निकषांमुळे एकाही शेतकर्‍याला याचा फायदा मिळणार नाही़ त्यामुळे आम्ही सर्व जिल्हाभर दौरे केले आणि याबाबत आता जिल्हाभर यासाठी मोठे आंदोलन जिल्हास्तरावर उभारण्यात येणार आहे़ येत्या 2 नोव्हेंबर रोजी प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकार्‍यांंना याबाबत निवेदन दिले जाईल, असे आमदार महाजन यांनी सांगितले.

80 महापालिका बरखास्त करणार का ?

जळगाव महापालिका बरखास्त करण्याच्या विरोधकांच्या मागणीबाबत विचारणा केली असता , आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी होत नाही़ भ्रष्टाचाराबाबत तक्रारी द्याव्या लागतात, केवळ पक्षांतराने महापालिका बरखास्त करायची काय? मुंबई सोडली तर राज्यातील 80 टक्के महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. मग, त्या सर्व बरखास्त करणार का? आवास्तव मागणी करुन केवळ प्रसिद्धीसाठी हे स्टंट असल्याची टीका आमदार महाजन यांनी केली.

भाजपा कार्यालयातून खडसेंचा हटविला फोटो

जळगाव येथील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, माजीमंत्री एकनाथराव खडसे, स्व.उदय वाघ आदींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याने सकाळीच नाथाभाऊंचा फोटो भाजपा कार्यालयातून हटविल्याचे चित्र होते.

भाजपासोबतच राहण्याची खासदार खडसेंची ग्वाही

नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपने पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी फुटू नयेत यासाठी गांभिर्याने आखणी केली आहे. मंगळवारी भाजपच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे उपस्थित नव्हत्या, मात्र, आजच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती दिली होती़ पूर्ण त्या बैठकीला थांबून होत्या़ भाजपसोबतच राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या