Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयएक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो आंदोलन- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

एक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो आंदोलन- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते २६ जून रोजी राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

- Advertisement -

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक आज दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर पक्षाच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनांना भाजप सक्रिय पाठिंबा देईल आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होतील. ओबीसींना पुन्हा आऱक्षण मिळण्यासाठी तातडीने करायचे काम महाविकास आघाडी सरकार करत नाही. याच्या निषेधार्ध भाजपा राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असे पाटील म्हणाले.

राज्यात २६ जून रोजी किमान एक हजार ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर येथे तर आपण स्वतः कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी होऊ. केंद्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असताना पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या जागांची पोटनिवडणूक जाहीर करून जखमेवर मीठ चोळले आहे. ही निवडणूक रद्द करा, या मागणीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज, शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. तर पंकजा मुंडे या विषयात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या