बांधकाम बेकायदेशीर नव्हते तर रात्रीतून ते का पाडले ?

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचेवर तथ्यहिन आरोप करणार्‍यांनी आपण केलेले बांधकाम बेकायदेशीर नव्हते तर

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली हे बांधकाम रात्रीतून का पाडली? याचा खुलासा करावा. तुम्ही काय अध्यक्षांवर मानहानीचा गुन्हा दाखल करता आम्हीच तुमच्यावर हा गुन्हा दाखल करू, असा प्रति इशारा इशारा आदिक समर्थक सामाजिक कार्यकर्ते रईस जहागिरदार यांनी दिला आहे.

पालिकेत गेल्या 4 वर्षांपासून लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक चांगल्याप्रकारे काम करत आहेत. शहरात अनधिकृत बांधकाम करणार्‍यांनी अध्यक्षांना दर सहा महिन्याला अविश्वास आणण्याचा उद्योग केला. त्यात त्यांना यश आले नाही. उलट त्यांचे मेनरोडवरील पाटणी कंपाऊंड, बळवंत भुवन येथील कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेले बांधकाम पाडावे लागले. ते म्हणतायेत आम्ही हे बांधकाम टाऊन प्लॅनिंगमुळे पाडले, यात कुठलेही तथ्य नाही. पालिकेने दिलेल्या नोटीशीमुळेच त्यांना ही बांधकामे पाडावी लागली. ते आता काहीही म्हणत असले तरी त्यांच्या कांगाव्यात तो दम नाही. केवळ नगराध्यक्षांना बदनाम करण्यासाठी पत्रकबाजी केली जात आहे, असा आरोप रईस जहागिरदार यांनी केला.

जहागिरदार म्हणाले, नगराध्यक्षा आदिक अति हुशार आहेत हे यांना स्वत:चे बांधकाम पाडल्यावर समजले का? तुम्ही स्वत:ला इतके हुशार समजतात तर तुमच्यावर कोट्यवधींचे बांधकाम पाडण्याची वेळ का आली? तुमची सत्ता असती तर तुम्ही हे बांधकाम पाडले असते का? तुमचे स्वत:चेच बांधकाम तुम्ही चुकीचे करत होतात तर गेल्या 25 वर्षात तुम्ही पालिकेचे किती नुकसान केले आहे.

हे शहरवासिय ओळखून आहेत. साठवण तलावातील ‘हार्ड रॉक’ कुठे गेला? यावर अनेकवेळा पालिकेच्या सभेत चर्चा झाली. त्याचे उत्तर अजून दिलेलेच नाही? शहरातील आज जी वाहतुकीची समस्या आहे त्याला जबाबदार आपणच आहात. अनेक बांधकामे तुमची बेकायदेशीर आहेत. त्यांना पार्किंगच नाहीत आणि तुम्ही नगराध्यक्षा आदिक यांच्यावर आरोप करत आहात. या चोराच्या उलट्या बोंबाच नाही का? असे जहागिरदार म्हणाले.

आदिक कुटुंबियांनी शहराच्या जडणघडणीला हातभारच लावला आहे. स्व. खा. गोविंदराव आदिक यांनी केलेल्या कामांची यादी मोठी आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी 4 वर्षांत शहरात कोठे जागा घेतली ते जाहीर करा. त्यांनी कुणाची जागा हडप केली का ते सांगा? असा सवालही रईस जहागिरदार यांनी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *