Friday, April 26, 2024
Homeनगरजगताप-काळे जुन्या वादाला नव्याने तडका

जगताप-काळे जुन्या वादाला नव्याने तडका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगर शहरातील

- Advertisement -

आ. संग्राम जगताप आणि काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात पुन्हा जुंपली आहे. वास्तवात काळे हे राष्ट्रवादीत असतानाही आ. जगताप आणि त्यांच्या समर्थकांसोबत जमले नव्हते. त्यावेळी एकाच पक्षात असताना दोन्ही गटांत वारंवार खटके उडत होते. आता काळे काँग्रेसमध्ये असले तरी आ. जगताप समर्थकांसोबत त्यांचा असणारा वाद हा जुनाच असून त्याला आता नव्याने तडका बसला आहे.

नगर शहरातील किरकोळ प्रकरणावरून सत्ताधारी दोन पक्षांच्या पदाधिकार्‍यांमधील जुना वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष काळे यांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याचा आरोप करताना जगताप यांचा गुंड असा उल्लेख केला आहे.

काळे यांनी जगताप समर्थकांकडून धमकावल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार (एनसी) दिली आहे. आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात असून नियोजनबद्धरित्या बनाव निर्माण करत शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

दुसरीकडे काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, आता ते जबाबदार पदावर आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आ. जगताप यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा पराभव केला होता.

काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. यासंबंधी आता आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. तसेच कायदेशीर कारवाईही करणार आहोत, असेही खोसे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता असून राज्यपातळीवरील नेते यात लक्ष घालणार का? हा प्रश्न आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले या दोन्ही पक्षांचे नेते या वादात काय भूमिका घेणार याकडे नगरचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेदही असेच वरिष्ठ पातळीपर्यंत गेले होते. त्यातून तोडगा काढून मनोमिलन झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र या मतभेदांची धग अद्यापही कायम आहे. त्यातच आता दोन्ही काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. यामुळे नगरमध्ये आघाडीचे कसे होणार हा प्रश्न आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या