‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार ८० टक्के फी परतावा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | Nashik

राज्यभरातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) (ITI College) केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश (Online Admission) घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण शुल्क परत करण्याचा (Training Fee Refund) दिलासा देणारा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने (Department of Vocational Education and Training) घेतला आहे.

चालू वर्षी प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना याचा लाभ होऊ शकणार आहे. करोना संकटामुळे (Corona) शाळा-महाविद्यालयांची फी भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. राज्यभरातील शासकीय व खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी (ITI Candidates) देखील अशा अडचणींचा सामना करीत आहेत.

‘आयटीआय’ मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांमधील आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींची संख्या अधिक आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असते. याच पार्श्वभूमीवर अशा प्रशिक्षणार्थीना केवळ पैशांअभावी व्यावसायिक कौशल्यापासून वंचित राहावे लागू नये तसेच शुल्काचा भार पडू नये, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला.

यात व्यवसायिक प्रशिक्षण शुल्क (Vocational training fees) काही प्रमाणात परत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आलेल्या या प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचा इतर मागास वर्ग (ओबीसी) विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना लाभ होणार आहे.

आपले सरकार महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) किंवा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तयार केलेल्या ‘स्कील वॉलेट’ या माध्यमातून ८० टक्के शुल्क प्रशिक्षणार्थीना परत केले जाणार आहे.

  • केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणे बंधनकारक

  • शासकीय आयटीआयमधील ‘पीपीपी’ योजनेंतर्गत उपलब्ध जागांसाठी लाभ

  • खासगी आयटीआयमधील व्यवस्थापन कोट्यासाठी योजना

  • राखीव प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर उमेदवारांनाच योजनेचा लाभ मिळणार

  • प्रमाणित नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

  • बेशिस्त वर्तणूक असलेल्या प्रशिक्षणार्थीला योजनेचा लाभ मिळणार नाही

  • संबंधित प्रशिक्षणार्थीने यापूर्वी आयटीआय अभ्यासक्रम केलेला नसावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *