नेवासा तालुक्यातील प्रश्‍नांबाबत ना. गडाख यांनी घेतली आरोग्य मंत्री टोपे यांची भेट

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील माका, घोगरगाव, नेवासा बुद्रुक, टोका येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्याचबरोबर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा सेंटर, कुकाणा व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय म्हणून रुपांतरीत करण्यात येणार आहेत.

नेवासा तालुक्यातील आरोग्य विषयक प्रश्‍नांबाबत जलसंधारणमंत्री व नेवाशाचे लोकप्रतिनिधी ना. शंकरराव गडाख यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नेवासा तालुक्याच्या आरोग्य विषयक विविध समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोग्याच्या विविध प्रश्‍नांबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी बैठक घेवून आरोग्य मंत्र्यांच्या दालनात बैठक घेवून लेखी प्रस्ताव सादर केला. माका, घोगरगाव, शिरसगाव नेवासा बुद्रुक, टोकासह एकूण 6 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याबाबत सकारात्मक वाटचाल चालू असल्याचे व लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे संकेत यावेळी आरोग्य मंत्र्यांनी दिले.

घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रामा सेंटरचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आरोग्य सेवा संचालक यांना केली. नगर जिल्हा व नेवासा तालुक्यात लस पुरवठा जास्त प्रमाणात केला जावा अशी मागणी ना. गडाख यांनी केली.

यावेळी आरोग्य सेवा संचालक साधना तायडे, सहसंचालक डॉ. कांदेवाढ, सहसचिव रामा स्वामी उपस्थित होते. भेंडा आरोग्य केंद्राबाबत विशेषबाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाला असून माका येथे नवीन उपकेंद्र मंजूर करणेबाबत आरोग्य मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत.

माका, घोगरगाव, नेवासा बुद्रुक ,टोका येथे उपकेंद्र मिळण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. तालुक्यातील महामार्गावर अपघात झाल्यास रुझग्णांना तात्काळ अत्यावशक सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रामा सेंटरची मागणी ना. गडाख यांनी केली होती. त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले गेले आहे.

कुकाणा व सोनई प्राथमिक केंद्रा अंतर्गत 60 हजार इतकी लोकसंख्या आहे. म्हणून या आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी गडाख यांनी केली. त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ सूचना देऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येचा विचार करता व करोनाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता वाढीव आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने मोरेचिंचोरा, तामसवाडीचा पाठपुरावा ना गडाख यांनी चालू केला आहे. नेवासा तालुक्यातील नादुरुस्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र याबाबत दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना नामदार टोपे यांनी पत्र दिले आहे.

टोका, नेवासा खुर्द येथील इमारती जीर्ण झालेल्या असल्याने तत्काळ त्या इमारती निर्लेखित करून नवीन इमारती बांधकाम करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री यांनी दिले आहेत. तसेच घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देखील विभागाला दिल्या आहेत. नेवासा फाटा येथे चालू असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी आणखी सुविधा कशा उपलब्ध होतील याचीही चर्चा बैठकीत झाली.

सकारात्मक चर्चेचे फलित

माका, घोगरगाव, नेवासा बुद्रुक व टोका येथे उपकेंद्र

घोडेगाव येथे ट्रॉमा सेंटरसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

कुकाणा व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालय करण्यावर मंत्र्यांच्या सूचना

वाढीव आरोग्य सेवेसाठी मोरेचिंचोरा व तामसवाडीचा पाठपुरावा

टोका व नेवासा खुर्द येथील जीर्ण इमारती निर्लेखित करुन नवीन बांधकामाचे निर्देश

भेंडा आरोग्य केंद्राबाबत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *