Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रइस्रायली दूतावासाचे मराठीत ट्वीट; मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन

इस्रायली दूतावासाचे मराठीत ट्वीट; मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन

मुंबई l Mumbai

मुंबई महानगरपालिका (BMC) व आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीस लिमिटेड (I. D. E. Water Technologies) यांच्याद्वारे मालाड, मनोरी येथील तब्बल 200 दशलक्ष लिटर समुद्रातील खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड पाण्यात करण्याच्या प्रकल्प राबवला जाणार आहे. समुद्रातील पाण्याला गोड करण्याचा हा प्रकल्प इस्रायली (Israel) तंत्रज्ञानाद्वारे केला जाणार आहे.

- Advertisement -

या संदर्भात मुंबई महानगरपालिका व आय. डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीस (I. D. E. Water Technologies) या इस्रायली कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. या करारानंतर इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानं ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं अभिनंदन केलं आहे. विशेषबाब म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्वीटमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा करार झाला. मुख्यमंत्री म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतू त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. शेवटी विकास करतांना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी आज मालाड येथे उभ्या करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालय तसेच कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पणातून मुंबईकरांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.

अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पाहता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते म्हणाले की, यामुळे बऱ्याच दिवसांची मागणी यातून पूर्ण होईल. एसटीपी प्रकल्पातील रिसाकल केलेले पाणी बांधकाम क्षेत्रासह इतर बाबींसाठी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आणखी मजबूत करता येईल. या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या