आयएसओ मानांकनासाठी सज्ज व्हा – भावले

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने आयएसओ करण्यासाठी आतापर्यंत जिल्हा व तालुका स्तरावर अनेक बैठका घेत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे. रंगरंगोटी करणे, रजिस्टर अद्यावत करणे, सर्वत्र एकाच आकाराचे फलक लावणे, राज्य सरकारने दिलेल्या पूर्तता करून महिना अखेरपर्यंत सर्व धान्य दुकाने सज्ज करा, असे आवाहन जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी दत्तात्रय भावले यांनी केले.

श्रीरामपूर तहसील कार्यालयात आयोजित तालुक्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपिठावर नायब तहसीलदार अभया राजवळ, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी, संघटेनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले उपस्थित होते.

श्री भावले म्हणाले, राज्य सरकारने आयएसओ मानांकनासाठी 91 प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या नगर येथील बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही तालुकास्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे. त्यास अनेक दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या दुकानदारांना मानांकन प्राप्त होईल त्यांना लवकरच सरकारकडून सीएससी केंद्रासारख्या पुढील व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्च महिन्यापासून श्रीरामपूर तालुका गोदामाच्या धान्य पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा येत असल्याने वितरणावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. रेशनकार्डधारक व दुकानदारांत विनाकारण वाद होत आहेत. सध्या सणासुदीचे व पावसाळ्याचे दिवस आहेत. अन्न धान्यांची नितांत गरज आहे. आम्ही आयएसओ करिता प्रयत्नशिल आहोत पण तुम्ही आम्हाला वेळेवर धान्य पुरवठा करा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केली.

यावेळी गोपीनाथ शिंदे, दिलीप गायके, माणिक जाधव, सुभाष चोरडीया, प्रकाश गदिया, मुरली वधवाणी, चंद्रकांत गायकवाड, देवराम गाढे, अनिल मानधना, योगेश नागले, अजीज शेख, एकनाथ थोरात, सुधिर गवारे, नरेंद्र खरात, उमेश दरंदले, मच्छिंद्र भालके, श्याम पवार, सचिन मानधने, बाळकृष्ण कांगुणे, विजय मैराळ, राजन वधवाणी, धनु झिरंगे, वासुदेव वधवाणी आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *