Friday, April 26, 2024
Homeनगरअनियमितता प्रकरणी ‘काष्टी’ च्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अनियमितता प्रकरणी ‘काष्टी’ च्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

राज्यात नावलौकिक असलेल्या व महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याकडून अनेक पुरस्कार प्राप्त काष्टीच्या सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक मंडळ, तसेच सचिव, व्यवस्थापक व बँक अधिकार्‍यांना कलम 83 च्या चौकशीनंतर कलम 146 प्रमाणे कारवाई का करू नये, म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी नोटी बजावली आहे. 146 नोटीसनुसार संचालक मंडळाचे खुलासे असमाधानकारक असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. या नोटीसमुळे श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राकेश कैलास पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत रविवारी माहिती दिली. पाचपुते व मानेसह त्यांच्या सहकार्‍यांनी काष्टी संस्थेच्या गैरकारभाराबद्दल एक वर्षापूर्वी सहकार खात्यासह, सहकार मंत्र्यांपर्यंत पुराव्यासह केलेल्या तक्रारीमुळे महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 83 नुसार प्रमुख 12 मुद्द्यांवर 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020 या कालखंडातील कारभाराची चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यांवर संस्था संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक, हे दोषी असल्याचे सहकार खात्याच्या चौकशीत समोर आले.

पाचपुते आणि माने यांनी वर्षभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भगवानराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील गैरकारभाराचा भांडाफोड केला होता. त्यानंतर सहकार खात्याने 1996 पासून 2020 पर्यंत 24 वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पहाणारा एस. बी. बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी निलंबित केले होते. तसेच चौकशी अधिकारी म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर याची नियुक्ती केली. यामध्ये 30 मार्च 2021 रोजी प्राधिकृत चौकशी अधिकारी यांचा 787 पानांचा चौकशी अहवाल शासनास सादर करण्यात आला. यामध्ये पाच वर्षांत कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप करणे, यात संस्थेच्या 128 सभासदांना 2 कोटी 21 लाख 78 हजार 500 रुपये इतक्या रक्कमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप केलेले चौकशीत उघड झाले आहे.

यामध्ये संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण झाले आहे. 128 पैकी 95 सभासदांच्या नावाने कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले. त्यामध्ये ज्या सभासदांना नियमबाह्य कर्जे दिली त्यांना कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. भगवानराव पाचपुते यांची मुलगी आश्विनी हिच्या नावे फक्त 27 गुंठे जमीन असताना तिला 1 लाख 5 हजार कर्ज देऊन तिला 1 लाख 37 हजार 175 रुपयांची शासकीय 2019 ची कर्जमाफी मिळून दिली, हेही अहवालात उघड झाले. संस्थेत संचालक मंडळ व सचिव यांनी संगनमत करून गलथान कारभार करत संस्था अडचणीत आणली, याची जबाबदारी निश्चित करून सहायक निबंधक यांनी आता 146 च्या चौकशीसाठी नामदेव ठोंबळ कोपरगाव यांची नियुक्ती करत कामकाज सुरू आहे.

सुमारे दोनशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या संस्थेची आत्ताची वार्षीक उलाढाल 45 कोटीच्या खाली आलेली आहे. ही गंभीर बाब सभासदांच्या पुढे आली आहे. सहकार खात्याने 83 नुसार चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल सादर केला आहे. यामुळे संस्थेचा गैरकारभार समोर आला आहे. आता कलम 146 प्रमाणे दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहकार खात्याने सुरू केली असल्याची माहिती पाचपुते व माने यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष कैलासराव पाचपुते,अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे, माजी उपसभापती वैभव पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, दत्तात्रय गेणबा पाचपुते, मधूकर क्षीरसागर बंडू जगताप, काशिनाथ काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या