Friday, April 26, 2024
Homeनगरअनियमित व कमी दाबाच्या विद्युतपुरवठ्याने शेतकर्‍यांचे नुकसान

अनियमित व कमी दाबाच्या विद्युतपुरवठ्याने शेतकर्‍यांचे नुकसान

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव आणि पंचक्रोशीत विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अनियमित व कमी दाबाच्या विद्युत पुरवठा यामुळे शेतकर्‍यांची विद्युत पंप मोठ्या प्रमाणात जळत आहेत.

- Advertisement -

विद्युत पुरवठा सारखा खंडित होत असतो व कमी-जास्त दाबाने विद्युत पुरवठा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोटारी जळत आहेत. कमी दाबात मोटारी चालाव्या म्हणून शेतकर्‍यांनी वेगवेगळी जुगाड तयार केली आहेत. परंतु विद्युत बिघाडामुळे विद्युत मोटारी मोठ्या प्रमाणात जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मोटार दुरुस्त करणे त्याचबरोबर पंपाची कामे यामुळे शेतकर्‍याला मोठी आर्थिक झळ बसत आहे. विद्युत मोटारी दुरुस्त करणारे वायरमन, पंप दुरुस्त करणारे यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारीत ठेवायला व पंप ठेवायला देखील जागा नाही. उन्हाळ्याचे दिवस, अल्पकाळ विद्युत पुरवठा यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत.

वर्कशॉपचे मालक रोख पैशाची मागणी करतात. परंतु शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. विनंती अर्जव करून काही प्रमाणात पैसे भरून आपले काम पूर्ण करण्याच्या प्रयत्न आहे. त्यासाठी त्याला वारंवार दुकानदाराचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ठराविक काळात वीज मिळावी आणि तीही योग्य दाबाने मिळावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या