Friday, April 26, 2024
Homeनगरआयर्नमॅन स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांचा डंका

आयर्नमॅन स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांचा डंका

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

स्पेनमधील विटोरिया गेस्टेज या शहरात झालेल्या जागतिक स्तरावरील आयर्नमॅन या शारीरिक व मानसिक धैर्याची कसोटी पाहणार्‍या ट्रायथलॅन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या पाचमध्ये संगमनेरच्या तीन स्पर्धकांचा समावेश होता. 10 जुलै रोजी झालेल्या तिहेरी अडथळ्याच्या स्पर्धेत संगमनेरचे डॉ. संजय विखे, उद्योजक करण राजपाल आणि अमर नाईकवाडी या तीनही स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली.

- Advertisement -

या स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमिटर सायकलिंग आणि 42.2 किलोमिटर धावण्याची स्पर्धा, असे तिहेरी आवाहन लागोपाठ पूर्ण करण्यासाठी मोठी शारीरिक व मानसिक तयारी लागते. हे तिनही विक्रम या स्पर्धकांनी आपल्या नावावर केले आहेत.

विटोरिया गेस्टेज या शहरात स्पेनमधील वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता या तीनही स्पर्धकांनी पोहण्यास सुरुवात केली. डॉ. विखे यांनी या स्पर्धेमध्ये आघाडी राखली. अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना यावेळी त्यांना करावा लागला. पोहण्याची स्पर्धा संपल्यानंतर लगेचच सायकलिंगची सुरुवात या स्पर्धकांनी केली. साधारण 8 तासांच्या अथक परिश्रमाने त्यांनी सायकलिंग पूर्ण केली आणि धावण्यास सुरुवात केली. डॉ. संजय विखे यांनी ही स्पर्धा 13 तास 37 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांच्या वयोगटामध्ये त्यांचा 278 वा क्रमांक आला. करण राजपाल यांनी ही स्पर्धा 13 तास 58 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांचा जगभरात त्यांच्या वयोगटात 107 वा क्रमांक आला. अमर नाईकवाडी यांनी ही स्पर्धा 14 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांचा जगभरात त्यांच्या वयोगटात 156 वा क्रमांक आला.

226 किलोमिटरच्या या स्पर्धेसाठी सलग 14 तास अथक परिश्रम या तिघांनी घेतले. गेल्या 5 वर्षांपासून या स्पर्धेची तयारी सुरू होती. अगदी पहाटे उठून नाशिक-पुणे बायपास येथे सायकलिंगची तयारी या स्पर्धकांनी केली होती. अनेक तास जिममध्ये घालविल्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये कसा तग धरू शकतो यासाठी त्यांनी सर्व पूर्ण तयारी केली होती. केवळ शारीरिक क्षमता नाही तर डाएटवर सुध्दा त्यांनी विशेष भर दिला.

या वर्षीच्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये जगभरातून 3 हजार खेळाडू सहभागी झाले होते. भारतातील 5 खेळाडूंमधून 3 खेळाडूंनी संगमनेरचे प्रतिनिधीत्व स्पेनमध्ये केल्याने संगमनेरचा गौरव उंचावला आहे. या स्पर्धकांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. संजय मालपाणी आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या