Wednesday, April 24, 2024
Homeनगरसातमोर्‍याजवळील लोखंडी पूल कधी होणार?

सातमोर्‍याजवळील लोखंडी पूल कधी होणार?

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अस्तगाव येथील गोदावरी कालव्यावरुन ये-जा करण्यासाठी असणारा लोखंडी पूल जिर्ण झाला आहे. पावसाळा जवळ आलेला असताना आता हा पूल केव्हा होणार, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पठारे यांनी केला आहे.

- Advertisement -

अस्तगावच्या गावठाणा लगत गोदावरीचा उजवा कालवा वाहतो. गावठाणाच्या दोन्ही बाजुंनी दोन ओढे वाहतात. त्यामुळे ब्रिटीशांनी ही परिस्थिती पाहुन त्या काळच्या अभियंत्यांनी गावानजीक सात मोर्‍या कालव्याला केल्या. यामुळे पावसाळ्यात दोन्ही बाजुंने येणारे पाणी या मोर्‍यांखालुन वाहत जाते. या सात पैकी एक किंवा दोन मोर्‍या या पूर्व बाजुला राहणारे रहिवासी, गणेशनगर, रांजणगाव, एकरुखे व त्या दिशेच्या व पश्चिम बाजूचे आडगाव, पिंप्रीनिर्मळ, खडकेवाके आदी गावातील नागरिकांना जा-ये करण्यासाठी उपयोगी येतात. या मोर्‍यांखालूनच रस्ता आहे. मध्यंतरी जलसंपदा विभागाने या मोर्‍यांचे मजबुतीकरण केले. त्यामुळे त्यांची उंची अजुनच कमी झाली. वाटसरु, सायकलस्वार सहजगत्या जातात. मात्र चार चाकी वाहनांना कायमच अंदाज घेऊनच मोर्‍यांखालून जावे लागते.

या मोर्‍यांखालून सातत्याने जा ये चालू असते. गावात येण्यासाठी, इतरत्र जाण्यासाठी या मोर्‍यांचा उपयोग होतो. या मोर्‍यांच्या दोन्ही बाजूने डांबरी रस्ते आहेत. पावसाळ्यात शाळकरी मुलांपासून तर वाहनांना व इतर सर्वांनाच गुडघ्याइतक्या पाण्यातून वाट काढावी लागते. पावसाळ्यात या सातही मोर्‍या निम्म्याहुन अधिक क्षमतेने वाहते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो.

या पूर स्थितीमुळे या मोर्‍यांवरुन एखादा पुल असावा अशी अनेक दिवसांची मागणी आहे. जलसंपदा विभागाने दिड किमी अंतरावर या पुर्वीपासून एक पूल बांधलेला आहे. दोन पुलात किमान तीन किलोमिटरचे अंतर असावे, असा जलसंपदाचा फतवा आहे. त्यामुळे हा पुल रखडला आहे. त्याचे मोठा फटका रहिवाशांना बसत आहे. अस्तगाव- वाकडी हा जुना रस्ता नकाशावर आहे. या रस्त्यांना जोडण्यासाठी किमान पुलाची आवश्यकता आहे. तिथेही पूल झाल्यास मोठी गैरसोय ग्रामस्थांची दूर होवू शकते.

या सातमोर्‍याजवळ एक पादचारी पूल जलंसंपदाने बांधला होता. तत्कालिन जलसंपदा राज्यमंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या प्रयत्नातुन हा पूल करण्यात आला होता. या पूलावरुन किमान पादचारी जातील, असा त्यामागचा हेतू होता. परंंतु गेल्या 7-8 वर्षापासुन हा पूल कमालीचा वाकला आहे. तो चालण्यास अयोग्य झाला आहे. किमान सातमोर्‍यांजवळ दशक्रियाविधी पार पडतात, तेथे लोखंडी पूल जलसंपदाने उभारावा.

हा लोखंडी पूल जीर्ण झाल्याने अपघात होण्याची भीती असल्याने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी नवीन पूल व्हावा यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने सर्व्हेही केला आहे. काम होणार आहे. आमदार विखे पाटील यांचे स्वीय सहायक प्रमोद राहाणे यांनी स्वत: होवुन याची पाहणी केली आहे. या ठिकाणी पक्का पूल व्हावा, अशी मागणी आहे.

– वाल्मिकराव गोर्डे, संचालक बाजार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या